अजित पवारांची पाच तास चौकशी
By admin | Published: October 22, 2015 02:17 AM2015-10-22T02:17:06+5:302015-10-22T02:17:06+5:30
रायगड जिल्ह्यातील बाळगंगा प्रकल्पाच्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कसून चौकशी केली.
मुंबई : रायगड जिल्ह्यातील बाळगंगा प्रकल्पाच्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कसून चौकशी केली. वरळी येथील मुख्यालयात पाच तास झालेल्या चौकशीत प्रकल्पाच्या नियोजन व निविदा प्रकल्पापासून कामाच्या पद्धतीच्या अनुषंगाने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. आवश्यकता वाटल्यास त्यांना चौकशीसाठी पुन्हा पाचारण करण्यात येईल, असे एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांची चौकशी ही राजकीय वर्तुुळात चर्चेचा विषय बनली आहे. यापूर्वी तीन वेळा नोटीस बजावूनही अजित पवार चौकशीसाठी हजर राहिलेले नव्हते. यावेळी हजर न राहिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते कार्यालयात हजर झाले. त्यांच्यासमवेत त्यांचे वकीलही होते.
बाळगंगा प्रकल्पाच्या कामा वेळी पवार व त्यानंतर तटकरे जलसंपदा विभागाचे मंत्री होते. त्यामुळे त्यांच्यावरही गैरव्यवहाराचा आरोप आहे. या प्रकरणी एसीबीने
ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात २५ आॅगस्टला गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी प्रकल्पाचे कंत्राटदार तिघा खत्री बंधूंसह अधिकारी राजेश रिटे, विजय कासट यांना यापूर्वीच अटक केली आहे.
एसीबीने पवार यांना यापूर्वी १६ सप्टेंबरला चौकशीसाठी ठाण्यातील कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजाविले होते. तेव्हा ते स्वत: हजर न होता त्यांच्यातर्फे वकील अॅड. सुनीलकुमार मुसळे, अॅड. कार्लोस हजर झाले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीव्यतिरिक्त अन्य तपशील विचारण्यासाठी त्यांना २२ सप्टेंबर रोजी हजर राहण्याची नोटीस दुसऱ्यांदा बजावण्यात आली. मात्र पवार या दिवशीही हजर न राहता त्याच्या वकिलांनी मुदत वाढवून गणेशोत्सवानंतर बोलाविण्यात यावे, असा अर्ज दिला होता. त्यानुसार २१ नोव्हेंबरला त्यांना चौकशीला हजर राहण्यास कळविण्यात आले. त्यानुसार पवार आज सायंकाळी वरळीतील मुख्यालयात हजर झाले. (प्रतिनिधी)
चौकशी टाळण्याचा प्रयत्न अयशस्वी
बाळगंगा प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी तपास अधिकाऱ्यांपुढे जबाब देण्यासाठी स्वत: हजर न होण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न होता. एसीबीच्या पहिल्या दोन नोटिसांवेळी त्यांच्या वकिलांनी त्यांच्यातर्फे बाजू मांडली. त्यानंतर आजही कार्यालयात हजर न होण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
तथापि, अनुपस्थित झाल्यास अटकेसारख्या कारवाईला सामोरे जावे लागेल, त्यामुळे आणखी बदनामी होईल, हे लक्षात आल्याने वकिलांच्या सल्ल्यानुसार अखेर सायंकाळी ते कार्यालयात हजर झाले. चौकशीनंतर पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.