सतेज यांच्या पराभवासाठी अजित पवार यांचे ‘बळ’
By admin | Published: October 22, 2014 12:34 AM2014-10-22T00:34:46+5:302014-10-22T00:37:20+5:30
राष्ट्रवादीचा ‘गेम प्लॅन’ : भाजपशी छुपी युती
विश्वास पाटील - कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अमल महाडिक यांच्या विजयासाठी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांची ‘अर्थपूर्ण’ मदत तर झालीच; परंतु अमल यांची भाजपची उमेदवारी निश्चित होण्यातही अजितदादांनी शब्द टाकल्याची माहिती आता पुढे येत आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने नियोजनबद्धरीत्या या घडामोडी केल्याचे सांगण्यात येते.
सिंचन घोटाळा, त्यासंबंधीची चौकशी व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर केलेला टीकेचा भडिमार या बाबी या घङामोडीच्या तळाशी आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार हे पंधरा सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी सतेज पाटील यांचा पराभव करा, अशा सूचना दिल्या होत्या, असे आता बोलले जात आहे.
सतेज पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अतिशय निकटचे सहकारी. उपमुख्यमंत्री असलेल्या पवार यांना नाही म्हटले तरी ते खुपत होते. त्याशिवाय पाटील हे सातारा जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री. त्यामुळे सातारा दौऱ्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे ते करत. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. तिथे राष्ट्रवादीला अडचणीची ठरेल अशी भूमिका सतेज पाटील यांच्याकडून घेतली जात असल्याच्या तक्रारी त्या पक्षाच्या नेत्यांकडून अजितदादांकडे होत होत्या. म्हणूनच निवडणुकीत सतेज पाटील यांना खिंडीत गाठण्याचा पद्धतशीर प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून झाल्याचे सांगण्यात येते. कऱ्हाडमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही राष्ट्रवादीनेच घेरले. तसाच प्रयत्न कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांच्याबाबतीतही झाला.
दोन्ही काँग्रेसच्या वाटा वेगळ्या झाल्यावर या मतदारसंघातून अरुंधती महाडिक यांनीच राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी, असा अजितदादांचा आग्रह होता. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडूनही त्यास प्रतिसाद होता; परंतु आमदार महादेवराव महाडिक यांनी आपण भाजपच्या नेत्यांना शब्द दिला असल्याने आता त्यातून मागे येता येणार नसल्याचे सांगून अमल यालाच रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला.
कदाचित त्यामागे मुलग्यास आमदार करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षाही असू शकते. भाजपचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने अमल यांच्या उमेदवारीच्या घडामोडी झाल्या. अजित पवार व गडकरी यांचे त्यावेळी अनुषंगाने बोलणे झाले होते अशी चर्चा आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही पंतप्रधान मोदी यांची हवा आहे. शिवाय कोल्हापुरात त्यांची सभाही होणार आहे. त्यामुळे महाडिक गटाची ताकद,भाजपचे वारे व सतेज पाटील यांच्याबद्दलची नाराजी असे एकत्रित झाल्यास त्यातून जमून जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी पटवून दिल्यावर आमदार महाडिक मुलग्यास भाजपकडून लढविण्यास तयार झाल्याचे सांगण्यात येते.
भाजपच्या उमेदवारीसाठी प्रताप कोंडेकर, जयंत पाटील, चंद्रकांत जाधव, निवासराव साळोखे यांच्यासह नऊजण इच्छुक होते. त्यांना बाजूला करून अमल यांचे नाव पुढे येण्यास या सगळ्या घडामोडी कारणीभूत आहेत. श्री. गडकरी इचलकरंजीच्या सभेसाठी आलेल्या दिवशी त्यासंबंधीच्या निर्णायक घडामोडी झाल्या. अमल याला उभे करून जरी तो पराभूत झाला तरी केंद्रात व राज्यातही भाजपचेच सरकार येणार असल्याने सत्तेचे पाठबळ मिळू शकते. त्या आधारावर राजकारण सोपे होईल, याचा विचार करून महाडिक यांनी हा जुगार खेळला व त्यात ते कमालीचे यशस्वी झाले. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या राजकारणाची व त्या पक्षाच्या नेत्यांच्या खेळी कशा होत्या, याबद्दलची चर्चा आता सुरू झाली आहे.
गडकरी व राष्ट्रवादी
कोल्हापुरात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या घडामोडी व आता मुख्यमंत्री पदासाठी भाजपमधून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येण्याशी जुळणाऱ्या आहेत.
भाजपमध्ये फडणवीस व गडकरी यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. फडणवीस व पवार यांच्यातही तसेच राजकीय हाडवैर आहे. म्हणूनच गडकरी मुख्यमंत्री होणे राष्ट्रवादीलाही हवे आहे.
आज अचानक भाजपच्या आमदारांनी गडकरी यांच्यासाठी लॉबिंग करण्यामागेही पवार यांचा गेम प्लॅन असल्याची चर्चा सुरू झाली आहे.