अजमेर एक्स्प्रेसमध्ये बॉम्बच्या अफवेने धावपळ
By admin | Published: May 11, 2016 10:56 PM2016-05-11T22:56:00+5:302016-05-12T00:16:18+5:30
कसून तपासणी : एक्स्प्रेसला सात तासांचा विलंब
मिरज : म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती अज्ञाताने रेल्वेच्या पुणे नियंत्रण कक्षाला दिल्याने मिरज रेल्वे स्थानकात अजमेर-एक्स्प्रेसची कसून तपासणी करण्यात आली. पण रेल्वेत काहीही आढळले नाही. बॉम्बच्या अफवेमुळे रेल्वेला मात्र सात तास विलंब झाला.
म्हैसूर येथून येणाऱ्या अजमेर एक्स्प्रेसच्या जनरल बोगीत बॉम्ब असल्याची माहिती अज्ञाताने रेल्वे सुरक्षा दलाच्या पुणे नियंत्रण कक्षाला आज सकाळी दिली. एक्स्प्रेस हुबळीतून निघाली असल्याने नियंत्रण कक्षाने याबाबत दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. अजमेर एक्स्प्रेसची बेळगावजवळ देसूर स्थानकावर व बेळगाव स्थानकावर पोलिस व बॉम्बशोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. दोन्ही स्थानकांवर तपासणीसाठी थांबविण्यात आल्याने अजमेर एक्स्प्रेसला सात तासांचा विलंब झाला. यामुळे दुपारी एक वाजता येणारी एक्स्प्रेस रात्री आठ वाजता मिरजेत आली. मिरजेतही तपासणीचे आदेश असल्याने रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस, गांधी चौक पोलिस, बॉम्बशोधक पथक व श्वानांच्या साहाय्याने एक्स्प्रेसची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत बॉम्ब असल्याची अफवा असल्याचे निष्पन्न झाले. विलंबामुळे प्रवासी मात्र हैराण झाले होते. (वार्ताहर)