अजोय मेहतांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 02:58 AM2019-05-14T02:58:41+5:302019-05-14T02:58:59+5:30
राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे अजोय मेहता यांनी सोमवारी मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्याकडून स्वीकारली. तसेच मदान यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून सूत्रे घेतली.
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे अजोय मेहता यांनी सोमवारी मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्याकडून स्वीकारली. तसेच मदान यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून सूत्रे घेतली.
अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटीमधून बी. टेक. (स्थापत्य अभियांत्रिकी) ही पदवी संपादित केली. ग्रेट ब्रिटनमधून एम.बी.ए. (वित्त) ही पदव्युत्तर पदवी तर मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.
नाशिक महापालिकेचे आयुक्त, नगरचे जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त, केंद्र सरकारचे फलोत्पादन विभागाचे संचालक, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक, राज्याच्या ऊ र्जा खात्याचे प्रधान सचिव; महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, मुंबई महापालिका आयुक्त यापदी त्यांनी काम केले आहे. मेहता यांनी सांगितले की, दुष्काळ निवारणासाठी सरकार उपाययोजना करत आहे. त्याची प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. मला ग्रामीण भागातही काम केल्याचा अनुभव गाठीशी असल्याने याबाबत अधिक चांगले काम करता येईल.