अकाली ‘स्वप्ने’ निमाली

By admin | Published: February 3, 2016 01:48 AM2016-02-03T01:48:12+5:302016-02-03T01:48:12+5:30

मुरुड जंजिरा येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांवर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

Akali 'dreams' Nimali | अकाली ‘स्वप्ने’ निमाली

अकाली ‘स्वप्ने’ निमाली

Next

पुणे : मुरुड जंजिरा येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांवर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे शिवाजीनगर, कोंढवा, धनकवडी, हडपसर भागातील नागरिकांवर शोककळा पसरली होती. दु:खद घटनेमुळे मंगळवारी महाविद्यालय बंद होते. महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना बुधवारी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
आबेदा इनामदार महाविद्यालयातील सहलीला गेलेल्या १३ विद्यार्थ्यांचे मृतदेह सोमवारी समुद्रातून बाहेर काढण्यात आले होते. मात्र, सैफ मडकी या मुलाचा मृतदेह सापडला नव्हता. मात्र, मंगळवारी सकाळी त्याचाही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. काही मुलांच्या नातेवाइकांनी स्वत: मुरुड येथे जाऊन आपल्या मुलांचे मृतदेह पुण्यात आणले. सकाळी साडेदहा वाजल्यापासून शहरात विविध ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यात सहलीवरून दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर आपल्या जवळच्या मित्रांच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला होता. भावुक वातावरणात त्यांनी घडलेली घटना आपल्या नातेवाइकांना सांगितली. काही विद्यार्थ्यांना या घटनेचा मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचे समुपदेश करून त्यांना धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन गेलेल्या प्राध्यापकांवर अद्याप कारवाई करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
मात्र, मंगळवारी सकाळी ११ वाजता आझम कॅम्पस येथील क्रिकेटच्या मैदानावर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाविद्यालय प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे महाविद्यालयाकडून घटनेचा अहवाल मागविला जाणार आहे. दरम्यान, महाविद्यालयाच्या आवारात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
> एकीला वाचविण्यासाठी घडली दुर्घटना
पुणे : दुपारची दोन वाजण्याची वेळ... मुरुड जंजिरा येथील समुद्रकिनारा... आबेदा इनामदार महाविद्यालयाचे विद्यार्थी समुद्राच्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पाण्यात जातात. आपण किती खोल पाण्यात जातो याबाबतचा अंदाज मुलांना येत नाही. अचानक पाण्याची पातळी वाढते आणि एक मुलगी बुडायला लागते... तिला वाचविण्याचा इतर विद्यार्थी प्रयत्न करतात आणि एकापाठोपाठ १४ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू होतो.
आबेदा इनामदार महाविद्यालयातील १३० विद्यार्थी मुरुड येथून सहलीसाठी गेले होते. त्यातील १४ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. उर्वरित विद्यार्थी सोमवारी रात्री उशिरा व पहाटे पुण्यात सुखरूप दाखल झाले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी घडलेल्या घटनेचा वृत्तान्त हृदयावर दगड ठेवून सांगितला. आपल्या मित्रांच्या बाबत घडलेला प्रसंग सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. सहलीला गेलेल्या एका विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. ती म्हणाली, की दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सर्व विद्यार्थी मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचले. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. जेवण करायचे त्यांनी जेवण करा, ज्यांना कपडे बदलून पाण्यात खेळायला जायचे त्यांनी खेळायला जा. त्यामुळे मी व माझा ग्रुप पाण्यात खेळायला गेला.
> त्याचे आयुष्य हे इतरांच्या मदतीसाठीच
पुणे : ‘‘तो नेहमी म्हणायचा आयुष्य हे इतरांच्या मदतीसाठीच आहे. त्याचीच प्रचिती देत तो सगळी सोसायटी... कॉलेजचे मित्र आणि नातेवाइकांंच्या गळ्यातला ताईत बनला होता. पण.. आयुष्याचा कोणताही विचार न करता हीच मदतीची भावना ठेवून त्याने एका मैत्रिणीचा जीव वाचविला आणि दुसरा जीव वाचविताना आपल्या जिवाची पर्वा न करता तो आम्हालाही सोडून गेला...’’ या भावना आहेत मुरूड येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २३ वर्षीय इफ्तिकार शेख या विद्यार्थ्याची बहीन रुखसाना हश्मीच्या. माझा भावाला चांगले पोहता येत होते. तो नियमित पोहण्याचा सराव करायचा. मात्र त्याच्या मृत्यूने आम्हाला धक्काच बसल्याची भावना रुखसाना हिने व्यक्त केली.
रुखसाना म्हणाली की, आबेदा इनामदार महाविद्यालयात कम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा इफ्तिकार हा बुद्धिमान आणि अभ्यासात हुशार होता. त्याच्या इतरांना मदत करण्याच्या स्वभावामुळे कोणार्क पूरम सोसायटीत सर्वांचा तो लाडका होता. शिक्षणाचे शेवटचे वर्ष पूर्ण करून त्याला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्टार्टअप इंडियासाठीही तो प्रयत्न करणार होता. तो मनाने अतिशय चांगला असल्याने आपले आयुष्य हे इतरांच्या मदतीसाठीच आहे हे नेहमी सांगायचा. सोमवारी दुपारी जेवणानंतर आपले काही मित्र समुद्रात बुडताना पाहून याच मदतीच्या भावनेने समुद्रात उडी घेतली. या वेळी त्याने अलिफिया काझी हिचे प्राण वाचविले.

Web Title: Akali 'dreams' Nimali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.