हवा चार कार्यक्रमांची, बाकी सगळी झुळूकच; स्वागताध्यक्षांच्या गाड्यांचा ताफा अन् सायरन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 04:57 AM2022-04-24T04:57:40+5:302022-04-24T04:58:02+5:30

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे हे दुसऱ्या दिवशी साहित्यनगरीत सकाळपासून ठाण मांडून बसले होते.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news | हवा चार कार्यक्रमांची, बाकी सगळी झुळूकच; स्वागताध्यक्षांच्या गाड्यांचा ताफा अन् सायरन

हवा चार कार्यक्रमांची, बाकी सगळी झुळूकच; स्वागताध्यक्षांच्या गाड्यांचा ताफा अन् सायरन

googlenewsNext

साहित्य संमेलनात कार्यक्रमांची प्रचंड रेलचेल आहे. पण स्वागताध्यक्ष राज्यमंत्री असल्यामुळे संमेलनाचा फायदा भविष्यातील स्थानिक राजकीय घडामोडींसाठी झाला पाहिजे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.  संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी झालेले अजय-अतुल, चला हवा येऊ द्या कार्यक्रम आणि उद्घाटनाला स्वागताध्यक्षांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित असल्यामुळे त्या तीन कार्यक्रमांकडे विशेष लक्ष दिले. समारोपालाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असल्यामुळे त्याकडे लक्ष देण्यात येत आहे. बाकी कार्यक्रमांसाठी पाहिजे तेवढे नियोजन, लक्ष देण्यात येत नसल्याची कुजबुज साहित्यिक गटागटाने करीत आहेत. त्यामुळे संमेलनात चार कार्यक्रमांचीच  हवा असून बाकी सगळी झुळूकच असल्याचा प्रत्यय येत आहे.

वाजवा रे टाळी.. 
साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी सायंकाळी ‘मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण; किती खरे, किती खोटे’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादातील एक वक्ते सतत रसिकांना वर हात करण्यास लावून वाजवा रे टाळी, अशी हाळी देत होते. त्यातून रसिकांचं मनोरंजन तर होतच होतं. परंतु अनेकांना वाजवा रे टाळी विषयी कुतूहलही वाटत होते. या वाजवा रे टाळीची चर्चा मात्र साहित्यनगरीत गटागटाने करण्यात येत होती.

भरउन्हात संमेलनाची जत्रा..
ग्रामीण भागात चैत्र पौर्णिमेनंतर गावोगाव यात्रांचे पेव फुटते. शेतीची कामे आटोपल्याने लोक निवांत असतात. शेतमालाचे चार पैसे हाती आल्याने मग देव-देव, जत्रा सुरू होते. उदगीरच्या संमेलनातही अशीच काहीशी कुजबुज रंगली होती. संमेलन नगरीत बाहेरगावच्या लोकांचे लोंढे दिसून येत होते. दुसरीकडे विविध सभागृहात मात्र घामाच्या धारा निघत असल्याने लोक काही वेळातच बाहेर पडताना दिसत होते. खाद्यकट्ट्यावर मात्र जत्रा भरून वाहत होती. त्यामुळे या संमेलनाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याची कुजबुज रंगात आली होती.

स्वागताध्यक्षांच्या गाड्यांचा ताफा अन् सायरन
साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे हे दुसऱ्या दिवशी साहित्यनगरीत सकाळपासून ठाण मांडून बसले होते. या सभामंडपातून त्या सभामंडपात सतत फिरत होते. त्यांच्यासोबत सगळ्या गाड्यांचा ताफाही फिरत होता. अगदी अंथरलेल्या गालिचावरून हा ताफा जात होता. ताफा जाताना सतत सायरन वाजविण्यात येत होते. त्यातून मंत्री महोदयांना नेमका कोणता संदेश द्यायचा होता, हे शेवटपर्यंतही रसिकांच्या लक्षात येत नव्हते. या सायरनची मात्र दबक्या आवाजात साहित्यनगरीत चर्चा सुरू होती.

Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.