Ketaki Chitale : “कोणाच्याही आजारावर उपहासात्मक लिहिणं ही विकृतीच,” केतकी चितळेच्या पोस्टवर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 01:38 PM2022-05-14T13:38:24+5:302022-05-14T13:38:34+5:30
अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हीनं आपल्या फेसबुक (Facebook) अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडूनही यावर आक्षेप घेण्यात आला असून कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासात्मक लिहिणं ही एक विकृतीच आहे, अशी स्पष्ट भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे (Anand Dave) यांनी घेतली आहे.
“आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबतचं वैचारिक शत्रूत्व कायम आहे आणि भविष्यातही आम्ही तितक्याच ताकदीनं लढत राहू. परंतु कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासात्मक लिहिणं, त्यांच्या मरणाची वाट पाहणं ही विकृतीच आहे,” अशी भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे. या आजाराला शिक्षा ही झालीच पाहिजे, असं म्हणत त्यांनी यावर आक्षेप घेतला. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केतकी चितळेनंशरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर ब्राह्मण महासंघानंही आक्षेपन नोंदवला आहे.
काय आहे प्रकरण?
केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती. तिनं आपल्या फेसबुकवर शेअर केलेल्या कवितेच्या खाली तिनं अॅडव्होकेट नितीन भावे असं नावंही दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच अनेकांनी तिच्या या पोस्टवर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, यावरून यानंतर तिच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.