यशस्वी दूध आंदोलन नेटाने पुढे नेऊया, अखिल भारतीय किसान सभेचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 01:38 PM2018-05-04T13:38:48+5:302018-05-04T13:38:48+5:30
दुधाला सरकारने प्रतिलिटर 27 रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले
मुंबई - दुधाला सरकारने प्रतिलिटर 27 रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’, अशी घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी दिल्या. अशा पद्धतीनं राज्यभर दूध आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवार दोन महत्त्वपूर्ण घटनांमुळे गाजला. पहिली घटना, राज्यात जोमदारपणे सुरू झालेले दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अभिनव मोफत दूध वाटपाचे आंदोलन करण्यात आले, दुसरी घटना म्हणजे पालघर जिल्ह्यात डहाणू येथे किसान सभा व माकपाच्या नेतृत्वाखाली, शेतकऱ्यांच्या जमिनींवर संक्रांत आणू पाहणारे भाजपा सरकारचे बुलेट ट्रेन आणि सुपर हायवे प्रकल्प हाणून पाडण्यासाठी आणि किसान सभेच्या लाँग मार्चच्या वनाधिकार, कर्जमाफी व इतर मागण्यांच्या अमलासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यांतील 35 हजार शेतकऱ्यांचा अभूतपूर्व निर्धार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने राज्यातील दूध आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला.
राज्य सरकारनेच जाहीर केलेल्या २७ रुपयांच्या हमी भावासाठी ३ मे पासून महाराष्ट्राच्या ९ जिल्ह्यांत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जोरदार मोफत दूध वाटप आंदोलन सुरू झाले. किसान सभेच्या नेतृत्वाचा व कार्यकर्त्यांचा या आंदोलनात महत्त्वाचा वाटा आहे.
आज फक्त १७ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना दिला जात आहे आणि सरकार तरीही मूग गिळून गप्प बसले आहे. या आंदोलनाने राज्य सरकारला बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील काही दिवस हे आंदोलन दररोज पेटत राहणे आणि पसरत जाणे अत्यंत निकडीचे आहे.
अखिल भारतीय किसान सभा हे दूध आंदोलन पेटविणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आणि किसान सभेच्या तसेच इतर सहभागी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे आणि विजय मिळेपर्यंत हे आंदोलन राज्यभर जास्त तीव्र करण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभेकडून करण्यात आले आहे.