अकोला रेल्वेस्थानकावर साडेबारा किलो गांजा जप्त
By admin | Published: May 18, 2014 08:34 PM2014-05-18T20:34:52+5:302014-05-18T22:07:32+5:30
अकोला रेल्वेस्थानकावर बेवारस स्थितीत साडेबारा किलो गांजाची बॅग रविवारी आढळली.
अकोला : रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीजवळ बेवारस स्थितीत साडेबारा किलो गांजाची बॅग आढळल्याची घटना रविवारी सकाळी १0.३0 वाजता घडली. रेल्वे पोलिसांनी गांजाची बॅग जप्त केली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीजवळ सकाळी प्रवाशांना एक बॅग आढळून आली; परंतु बराच वेळपर्यंत ही बॅग घ्यायला कुणी न आल्याने प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली आणि आधी रेल्वे स्टेशनवरील स्कॅनर मशीनमधून या बॅगची तपासणी केली असता, बॅगमध्ये काहीतरी काळा पदार्थ आणि दोन कांड्या असल्याचे दिसून आले. पोलिसांना बॅगमध्ये जिलेटीनच्या कांड्या असल्याची शंका आल्याने त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वानाने बॅगची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी बॅग कापून, त्यातील बंद पाकिट बाहेर काढले. पाकिट उघडले असता, त्यामध्ये गांजा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गांजाचे वजन केले. गांजा साडेबारा किलो भरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गांजाची किंमत ६0 हजार रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजाची तस्करी करण्याच्या उद्देशाने हा गांजा रेल्वे स्टेशनवर आणला; परंतु गांजा आणणार्या अज्ञात व्यक्तीला संशय आल्याने, त्याने गांजाने भरलेली बॅग तिकीट खिडकीजवळ ठेवून पळ काढला असावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.