अकोला विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा
By Admin | Published: December 24, 2014 12:42 AM2014-12-24T00:42:35+5:302014-12-24T00:42:35+5:30
कोणत्याही विभागाचा विकास करण्यासाठी त्या भागातील दळणवळणाची साधने सक्षम असणे आवश्यक असते. त्यामुळे अकोला विमानतळ विस्तारीकरणात येत असलेले सर्व अडथळे दूर करून
अडथळे दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : जिल्ह्यातील आमदारांची लक्षवेधी
नागपूर : कोणत्याही विभागाचा विकास करण्यासाठी त्या भागातील दळणवळणाची साधने सक्षम असणे आवश्यक असते. त्यामुळे अकोला विमानतळ विस्तारीकरणात येत असलेले सर्व अडथळे दूर करून विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. अकोला जिल्ह्यातील आमदारांनी लक्षवेधीद्वारे विमानतळाच्या विस्तारीकरणाची मागणी केली, त्यावर मुख्यमंत्र्यांनी शासन विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत सकारात्मक भूमिकेत असल्याचे सांगितले.
अकोला विमानतळाच्या विस्ताराची मागणी गत दहा वर्षांपासून करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला हे महत्त्वाचे शहर असून, संतनगरी शेगाव येथे दरवर्षी लाखो भाविक येतात. तसेच नरनाळा किल्ला व चिखलदरा येथून जवळ असल्यामुळे पर्यटकही येत असल्याने विमानतळाचा विस्तार आवश्यक आहे. मात्र, विस्तारीकरणासाठी जागा देण्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जागा देण्यास नकार देऊन खोडा घातला आहे. त्यामुळे या विमानतळाचा विस्तार करण्यातील अडचणी दूर करण्याची मागणी अकोला पूर्वचे आ. रणधीर सावरकर यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अकोला विमानतळाचे विस्तारीकरण अत्यंत गरजेचे असून, शासनाची त्याबाबत भूमिका सकारात्मक आहे. मात्र, विमानतळ विस्तारीकरणाबाबत एका प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी उच्च न्यायालयात शासन सक्षम बाजू मांडणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आ. गोवर्धन शर्मा यांनी अकोल्याच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी ५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी आला आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे विस्तार रखडला आहे. अधिकाऱ्यांनी घातलेला खोडा दूर करणार काय? असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाची स्थगिती उठल्याबरोबर विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात करू, असे सांगितले. यावेळी आ. हरीश पिंपळे यांनीही अकोल्याच्या विकासाकरिता विमानतळ आवश्यक असून, यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अडथळा आणत असल्याचे सांगितले. तसेच अचलपूरचे आ. बच्चू कडू यांनी या विमानतळावर तत्काळ विमानसेवा सुरू का करण्यात येत नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धावपट्टी छोटी असल्यामुळे विमान उतरविता येत नाही. विस्तारीकरणानंतर विमानसेवा सुरू करू, असे सांगितले. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनीही विमानतळावरून अमरावती विमानतळाप्रमाणेच दिवस-रात्र विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विमानतळ विस्तारीकरणानंतर तशी सेवा सुरू करू, असे आश्वासन दिले.विधानसभेतील सदस्य सर्वश्री रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे यांनी लक्षवेधी मांडली होती. (प्रतिनिधी)