अकोला - नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचे आगमन
By Admin | Published: August 30, 2016 05:46 PM2016-08-30T17:46:14+5:302016-08-30T17:46:14+5:30
अकोल्याच्या राजाचे मंगळवारी सायंकाळी टाळ, मृदूंग आणि हरिनामाच्या घोषात शहरात आगमन झाले
>- ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 30 - मुंबईच्या लालबागचा राजा नवसाला पाहण्यासाठी सर्वश्रृत आहे. तसाच अकोल्याचा राजा...लालबागचा राजाही नवसाला पावणारा आहे. अशा या अकोल्याच्या राजाचे मंगळवारी सायंकाळी टाळ, मृदूंग आणि हरिनामाच्या घोषात शहरात आगमन झाले. नागरिकांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी केली होती. भावपूर्ण वातावरणात नागरिकांनी फुलांची उधळण करून लालबागच्या राजाचे स्वागत केले.
लाडक्या गणरायाची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली तो बाप्पा पाहूणा म्हणून आपणा सर्वांच्या घरी लवकरच स्थानापन्न होणार आहे. या विघ्नहर्त्याचे प्रत्येक गणेशभक्ताने जल्लोषात, वाजतगाजत स्वागत करण्याची अकोलेकरांनी जय्यत तयारी आरंभिली आहे. शहरात सर्वात आधी अकोल्याचा राजा...लालबागच्या राजाचे आगमन होतं. माळीपूरा एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गत ३५ वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. परंतु दहा वर्षांपासून मंडळातर्फे लालबागच्या राजाची गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जेवढी गर्दी होती. तेवढी गर्दी अकोल्याच्या राजाच्या दर्शनालाही होते. भाविक मनोभावे गणरायाला ५१, १0१, २0१ किंवा त्यापेक्षा अधिक नारळ अर्पण करतात आणि गणरायापुढे आपले दु:ख, दारिद्र्य आणि मनातील इच्छा प्रकट करतात. अनेक भाविकांना त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याच्या अनुभव आला आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, सचिव राजेश चंदनबटवे, कैलास रणपिसे यांनी दिली. लालबागच्या राजाची हुबेहुब मुर्ति घडविणारे जठारपेठेतील मुर्तिकार शिवा मोकळकर यांच्या घरी मंगळवारी सायंकाळी माळीपूरा एकता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी लालबागच्या राजाला घ्यायला आले. जठारपेठ भागातून टाळ, मृदूंगाच्या तालावर आणि हरिनामाच्या जयघोषात लालबागच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली. मंडळाचे पदाधिकारी वाहनावरील लालबागच्या राजाला पायी चालत ओढत होते. ही मिरवणूक दादासाहेब दिवेकर चौक, सातव चौक, जठारपेठ चौक मार्गे रतनलाल प्लॉट चौकात पाहोचली. तेथून ही मिरवणूक टॉवर चौक, बसस्टँड चौक मार्गे गांधी रोड, टिळक रोड मार्गे माळीपूरा परिसरात पोहोचली. याठिकाणी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली.