अकोला जिल्ह्यात वीज कोसळून एक ठार
By admin | Published: March 28, 2016 01:51 AM2016-03-28T01:51:24+5:302016-03-28T01:51:24+5:30
पातूर तालुक्यात गारपीट; बलडाणा, वाशिम जिल्ह्यातही पावसाची हजेरी.
अकोला: जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला तालुक्यात सिसा बोंदरखेड येथे शेतात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. पातूर तालुक्यात आलेगाव येथे गारपीट झाली असून, तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले.
शनिवारी सायंकाळपासूनच अनेक भागांमध्ये वादळी वार्यासह हलक्या सरी कोसळल्या. आज दुसर्या दिवशी दुपारपासूनच वातावरण ढगाळ झाले होते. दुपारी साडे तीन वाजेनंतर काही भागात वादळी वार्यासह पाऊस झाला. अकोला तालुक्यातुव सिसा बोंदरखेड येथे सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास वीज अंगावर कोसळल्याने किशोर नागोराव वडतकार (३५) हे जागीच ठार झाले. कौलखेड परिसरातील वर्धमाननगरमध्ये बाळू मोहड यांच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे जीन्याचा टॉवर तुटला. तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे दुपारी वादळी वार्यासह पाऊस झाला. पातूर तालुक्यात अनेक ठिकाणी दुपारपासून अधूनमधून वादळी वार्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. शिर्ला येथे जोरदार पाऊस झाला. आलेगाव परिसरात दुपारी गारपीट झाली.
वाशिम जिल्ह्यात मेडशी परिसरात पावसाने हजेरी लावली. रिसोड तालुक्यात पिंपळखेड येथे वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली. तर बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, नांदुरा, मलकापूर, चिखली, मेहकर परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वार्याने घरावरील टिनपत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या.