अकोला बाजारपेठेत गावरान तिळावर संक्रांत
By Admin | Published: January 8, 2017 11:22 PM2017-01-08T23:22:04+5:302017-01-08T23:22:04+5:30
संजय खांडेकर अकोला, दि. 8: गुजरातचे पॅकिंग तीळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याने ऐन मकर संक्रांतीच्या सणावर अकोल्याच्या बाजारपेठेत गावरान ...
संजय खांडेकर
अकोला, दि. 8: गुजरातचे पॅकिंग तीळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याने ऐन मकर संक्रांतीच्या सणावर अकोल्याच्या बाजारपेठेत गावरान तिळावर संक्रांत आली आहे. नोटाबंदीनंतर थंडावलेला बाजार अजूनही सुधरला नसल्याने तिळगुळाचा पन्नास टक्के बाजार घसरला आहे.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येणाऱ्या मकर संक्रातीच्या निमित्ताने जानेवारीपासूनच गूळ आणि तिळाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यासाठी विदर्भाच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून गावरान तीळ अकोला बाजारात दरवर्षी येतो. साठ टक्के बाजार अकोल्यात गावरान तिळाचाच असतो; मात्र नोटाबंदीनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली. पाहिजे त्या तुलनेत गावरान तीळ दाखल झाला नाही. दरम्यान, ही रिक्त जागा भरून काढण्यासाठी गुजरात येथील पॅकिंग तीळ अकोल्यात दाखल झाला आहे. ९५ ते १२० रुपये कि लोच्या गुजरात तिळला मागणी वाढल्याने गुजरातचे एबी, बीबी आणि व्हीबी हे तीन प्रकारच्या ब्रॅन्डची विक्री वाढली आहे.
गुजरातच्या तुलनेत गजर मिक्स आणि गावरान तीळ कमी भाव असूनही मागे पडली आहे. दरवर्षी अकोलाच्या बाजारपेठेत कोल्हापूर, अंकापल्ली, खजूर, लातूर आणि हिंगोलीचा गूळ येतो. ४० ते ६० रुपये कि लोपर्यंतचा गूळ सध्या बाजारात विक्रीला असला तरी हिंगोलीच्या चोरसपाटा आणि कोल्हापूरच्या सेंद्रियलाच चांगली मागणी आहे.
-विदर्भातील तिळाच्या स्पर्धेत दरवर्षी उत्तर प्रदेशची तीळ अकोला बाजारपेठेत दाखल होत असतो; मात्र थंडावलेला बाजार पाहता, परिसरातील शेतकऱ्यांनी गावरान तीळ आणला नाही. त्यामुळे गुजरातच्या तिळाची मागणी वाढली आहे. बाजारात मुबलक तीळ असला तरी पाहिजे तसा बाजार नाही.
- सुशील पोतदार, किराणा बाजार अकोला.
-होलसेल भावात कोल्हापूरचा गूळ विकत घेऊन काही लघू व्यावसायिक सेंद्रियच्या नावाने अकोलाच्या नागरी वसाहतीत ठिकठिकाणी गाड्या लावून विक्री करीत आहे. ते खरेच सेंद्रिय आहे का, याची चाचपणी ग्राहकाने करावी. सोबतच त्यांचे वजन काटे तपासावेत. कारण कमी भावात चांगल्या प्रतीचा गूळ मिळूच शकत नाही.
-विजय तिवारी, दाणाबाजार, अकोला.