अकोला मेडिकल कॉलेज देशात सहावे!
By admin | Published: May 26, 2017 03:06 AM2017-05-26T03:06:16+5:302017-05-26T03:16:59+5:30
इंडिया टुडेचा सर्व्हे: सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महाविद्यालय उपक्रमांतर्गत गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : इंडिया टुडे या प्रतिष्ठित इंग्रजी साप्ताहिकाने सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महाविद्यालय उपक्रमांतर्गत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचा सर्व्हे केला होता. या सर्व्हेचा निकाल इंडिया टुडेने प्रसिद्ध केला असून, यात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा बहुमान मिळवून देशातून सहावा क्रमांक पटकावला आहे. यामुळे अकोलेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
इंडिया टुडे या प्रतिष्ठित इंग्रजी साप्ताहिकामार्फत दरवर्षी सर्व्हे केला जातो. यावर्षी इंडिया टुडेने देशभरातील नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्वेक्षण केले. देशभरातील शेकडो वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून देशभरातून दहा वैद्यकीय महाविद्यालयांची सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात देशातून सहावा क्रमांक पटकावून सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा बहुमान मिळविला. अकोलेकरांच्या आंदोलनात्मक पवित्र्याने आणि अथक परिश्रमानंतर अकोल्यात २००३ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. सर्वोपचार रुग्णालयसुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडण्यात आले. सुरुवातीला एमबीबीएस १०० जागा देण्यात आल्या होत्या. नंतर त्यात आणखी ५० जागांची भर पडली. वैद्यकीय महाविद्यालयात सध्या ७०० विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमाला शिकत आहेत. यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दहा विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरू झाले असून, एमबीबीएससोबतच अनेक विद्यार्थी एमडी होऊन येथून बाहेर पडतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसला शिकणारे विद्यार्थी केवळ शिक्षणच घेत नाही, तर संशोधनामध्येसुद्धा अग्रेसर आहेत. दोन वर्षांपासून आयसीएमआरकडून सातत्याने दोन वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड होत आहे. निकालसुद्धा दरवर्षी ९५ टक्क्यांच्यावर लागतो. यावर्षी आयसीएमआरने पोषक आहार घेणाऱ्या मातांच्या दुधावर संशोधन करण्यासाठी १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच इंडिया टुडेने देशातील सहाव्या क्रमांकाचे बेस्ट कॉलेज म्हणून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आपल्या यादीत स्थान दिले आहे. ही बाब अकोलेकरांसाठी अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज
इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात देशाभरातून सहाव्या क्रमांकाचे बेस्ट कॉलेज म्हणून निवड केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रातून एकमेव आहे. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाला इंडिया टुडेच्या यादीत स्थान मिळू शकले नाही. या यादीमध्ये अकोला वैद्यकीय महाविद्यालयासोबतच पाँडेचेरी, लखनौ, देहरादून, रांची, भोपाळ, नेल्लोर, इंदूेर, मँगलोर येथील वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.
इंडिया टुडे या प्रतिष्ठित इंग्रजी साप्ताहिकाने केलेल्या सर्वेक्षणात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने देशातून बेस्ट कॉलेज म्हणून सहावा क्रमांक पटकावला. ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे संशोधन येथील शिक्षण दर्जेदार आहे. यावर या सर्वेक्षणातून शिक्कामोर्तब झाले आहे. हा दर्जा टिकून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
डॉ. कुसुमाकर घोरपडे,
उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.