अंधेरी पोटनिवडणुकीत अकोला पॅटर्न?; "ऋतुजा लटकेंनी बिनधास्त अर्ज भरावा"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 02:50 PM2022-10-13T14:50:17+5:302022-10-13T14:51:06+5:30
डॉ. अभय पाटील हे अकोल्यातून काँग्रेसकडून २०१९ च्या निवडणुकीत उभे राहिले होते. तेदेखील शासकीय सेवेत होते.
अकोला - सध्या राज्यात अंधेरी पोटनिवडणुकीची बरीच चर्चा आहे. या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी सध्या धोक्यात आहे. ऋतुजा लटके या शासकीय सेवेत असल्याने त्यांनी दिलेला राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेले. मात्र शासकीय सेवेत असताना राजीनामा दिल्यानंतर तो नामंजूर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही अकोला येथे डॉ. अभय पाटील यांच्याप्रकरणात हे घडले आहे.
डॉ. अभय पाटील हे अकोल्यातून काँग्रेसकडून २०१९ च्या निवडणुकीत उभे राहिले होते. तेदेखील शासकीय सेवेत होते. याबाबत अभय पाटील म्हणाले की, मी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होतो. माझा राजीनामा मी दीड महिन्यापूर्वी दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे होते. त्यावेळी माझा राजीनामा मंजूर करणार नाही असं स्पष्ट सांगितले होते. मी न्यायालयीन बाबी ठेवल्यानंतर सचिवांनी सही करून दिली. परंतु तत्कालीन मंत्र्यांची सही हवी होती असं सांगण्यात आले. सचिवांच्या सहीनंतर खरेतर मंत्र्यांच्या सहीची गरज नव्हती. याच पद्धतीने ऋतुजा लटकेंबाबत प्रकार सुरू आहे असं त्यांनी सांगितले.
बिनधास्त अर्ज भरायला हवा
त्याचसोबत १ महिन्यापूर्वी राजीनामा दिला असेल तर तो मंजूर व्हायला हवा. स्थानिक निवडणुकीत राजीनामा न देता निवडणूक लढवली जाते. निवडून आल्यानंतर राजीनामा दिला जातो. परंतु आता कायदेशीर प्रक्रिया आहे. शिवसेनेने पूर्ण ताकद लावावी. प्रत्येक उमेदवाराने काळजी घेणे गरजेचे आहे. मला जो त्रास दिला तोच ऋतुजा लटकेंना होत आहे. माझ्याकडे कोर्टात जाण्यासाठी वेळ नव्हता. शिवसेनेकडे वकिलांची टीम आहे. अर्ज भरून घ्यावा. या बाबींवर निवडणूक अधिकारी हरकत घेऊ शकत नाही. त्यामुळे अर्ज बिनधास्त भरावा. कायदेशीर बाबींचा अभ्यास करता येईल. अर्ज भरायला हवा असं मला वाटतं असं काँग्रेस नेते अभय पाटील म्हणाले.
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माझी तयारी होती. मी निवडून येईल अशी खात्री होती. मी प्रत्येक गावात इतक्या वर्षापासून फिरत होतो. २५-३० वर्षापासून सामाजिक कार्य सुरू आहे. प्रत्येकाशी गाठीभेटी घेतो. गावकऱ्यांच्या अनेक समस्या मी सोडवल्या आहेत. मी आमदार, खासदार नसलो तरी प्रत्येकाला मदत करण्यासाठी मी तत्पर असतो. माझी २०२४ ची पूर्णपणे तयारी सुरू आहे. मी निवडून येईल असा विश्वास वाटतो असंही अभय पाटील यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"