अकोल्यामध्ये शिवसेनेत धुमश्चक्री
By admin | Published: October 17, 2015 03:18 AM2015-10-17T03:18:23+5:302015-10-17T03:18:23+5:30
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव गावंडे आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी क्षुल्लक कारणावरून धुमश्चक्री झाली.
अकोला : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव गावंडे आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी क्षुल्लक कारणावरून धुमश्चक्री झाली. यात पिंजरकर यांचा मुलगा कुणाल व पुतण्या मंगेश यांना किरकोळ दुखापत झाली. पिंजरकर यांच्या वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या. याप्रकरणी परस्परांविरोधात तक्रार देण्यासाठी खदान पोलीस ठाण्यात दोन्ही गट गेले होते; मात्र नंतर हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले.
कौलखड चौकात नवरात्रीनिमित्त उभारण्यात आलेल्या देवीच्या मंडपासमोर महिलांचे पारायण असल्याने शुक्रवारी आणखी एक मंडप उभारण्यात आला. हा मंडप श्रीरंग पिंजरकर यांच्या दुकानापुढे टाकण्यात आला. त्यामुळे कुणाल, मंगेश व पिंजरकर यांचा वाहनचालक या तिघांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडप काढण्यास सांगितले. त्यावरून कार्यकर्ते व पिंजरकर यांच्यात वाद झाला. शिवसेनेतील स्थानिक नेत्यांनी हा वाद आपसात मिटविला.