अकोल्यात वीज कोसळून एक ठार
By admin | Published: March 28, 2016 02:04 AM2016-03-28T02:04:09+5:302016-03-28T02:04:09+5:30
जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात काही भागांत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच पातूर तालुक्यात आलेगाव येथे गारपीटही झाली. त्यामुळे रब्बी
अकोला : जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात काही भागांत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच पातूर तालुक्यात आलेगाव येथे गारपीटही झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अकोला तालुक्यात सिसा बोंदरखेड येथे शेतात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.
शनिवारी सायंकाळपासूनच वऱ्हाडात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या. रविवारीही वातावरण ढगाळ झाले. दुपारी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पातूर तालुक्यात अनेक ठिकाणी दुपारपासून अधूनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. शिर्ला येथे जोरदार पाऊस झाला. आलेगाव परिसरात दुपारी गारपीट झाली.
सिसा बोंदरखेड येथील किशोर वडतकार (३५) बैलगाडीतून घराकडे जात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि ते बैलगाडीतच पडले. मालक गाडीत पडलेले असतानाही बैलांनी सवयीप्रमाणे घर गाठले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नगरमध्ये कांद्याचे नुकसान
नगरमध्ये शेवगावसह तालुक्यात रविवारी संध्याकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटात अवकाळी वादळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून दमटपणा वाढल्याने शेतकऱ्यांनी कांदा उघड्यावर काढून ठेवला होता. पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा झाकून ठेवण्यासाठी दिवसभर धावपळ सुरू होती.