Akshay Kumar Selfie Movie: अक्षय कुमारचा फ्लॉप चित्रपट वाचवण्याचा भाजपाचा प्रयत्न? राष्ट्रवादीचा केंद्रीय मंत्री Smriti Irani यांच्यावर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 06:34 PM2023-02-27T18:34:16+5:302023-02-27T18:34:45+5:30
अक्षय कुमारचा सेल्फी नावाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही
Akshay Kumar Selfie Movie, Smriti Irani vs NCP: भाजप आणि केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणीअक्षय कुमारच्या फ्लॉप झालेल्या 'सेल्फी' चित्रपटाचा प्रचार आणि चित्रपटाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी विचारला. काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या 'सेल्फी' या नव्या चित्रपटाचे प्रमोशन करताना सर्वाधिक सेल्फी घेण्याचा विक्रम मोडल्याची बातमी आली होती. पण त्याचा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याच्या चित्रपटाची कमाई न झाल्यामुळे चित्रपट फ्लॉप झाल्याच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आहेत. असे असूनही केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सेल्फी चित्रपटाचा प्रचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
आपण ऐकतो की भाजप महिला मोर्चा तर्फे 'एक कोटी सेल्फी' ही मोहीम केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रात सुरू करण्याची घोषणा केली आहे. दोघेही एकापाठोपाठ एक 'सेल्फी' काढत आहेत, ही उपरोधिक गोष्ट आहे की अभिनेता अक्षय कुमारची भाजपसोबतची जवळीक ओळखूनही एक विचारी योजना होती? अलीकडे स्मृती इराणी या केंद्रीय मंत्री असलेल्या महिला आणि बालविकासाशी संबंधित मुद्द्यांवर अत्यंत मौन बाळगून आहेत, परंतु ज्या मुद्द्यांवर त्यांना पक्षाचा बचाव करायचा आहे त्या मुद्द्यांवरच त्या बोलत आहेत, अशी टीका क्रास्टो यांनी केली.
स्मृती इराणी यांनी ही 'सेल्फी' मोहीम सुरू केल्याने चित्रपटा सोबतच्या समानतेमुळे लोकांमध्ये नक्कीच कुतूहल निर्माण होईल, असा त्यांचा मानस असावा. त्यातूनच या चित्रपटाच्या प्रमोशनचा प्रयत्न तर नाही ना? त्यामुळे एक प्रश्न मनात येतो की, भाजप आणि केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी अक्षय कुमारच्या फ्लॉप झालेल्या 'सेल्फी' चित्रपटाचे प्रमोशन आणि चित्रपट वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.