अक्षय कुमारची शहिदांच्या कुटुंबीयांना दिवाळी भेट; अक्षयने लिहिलं खास पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 01:58 PM2017-10-21T13:58:53+5:302017-10-21T14:09:38+5:30
अभिनेता अक्षयकुमारने 103 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला 25 हजाराचा धनादेश व दिवाळीसाठी मिठाई दिली आहे.
कोल्हापूर- पोलीस त्यांच्या कामात नेहमीच व्यस्त असतात. सणासुदीच्या काळात चोख बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारीसुद्धा पोलिसांच्या खांद्यावर असते. पण यातूनही वेळ काढून पोलिसांनी शहीदांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या कल्पनेतून ही दिवाळी साजरी करण्यात आली. ज्यांच्या घरातील वडील किंवा मुलगा शहीद झाले आहेत त्या 103 शहीदांची यादी तयार करुन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.
ही गोष्ट अभिनेता अक्षय कुमारला समजल्यावर त्यानेही या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. शहीदांच्या कुटुंबीयांतील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचा चेक आणि एक शुभेच्छा पत्र पाठवलं. यापैकी 39 धनादेशांचे वितरण कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरुपात दोन शहीद पोलीसांच्या कुटुंबियांना घरी भेट देवून सुरुवात करण्यात आली.
कसबा बावडा लाईन बाजार येथील सुरेश विठ्ठल जाधव (वय 44) यांचा कर्तव्यावर असताना अपघात झाला व त्यातच ह्दय विकाराने निधन झाले. त्यांच्याही घरी भेट देवून पालकमंत्र्यांनी अक्षयकुमार यांच्याकडून आलेला धनादेश व मिठाई दिली आणि त्यांचे पत्रही वाचून दाखविले. यावेळी त्यांच्या पत्नी रुपाली जाधव, मुले स्नेहल व प्रतिक आणि आई हौसाबाई जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी स्नेहल जाधव यांच्याशी अक्षयकुमार यांनी स्वत: दूरध्वनीवरुन संवाद साधला.
अक्षय कुमारने लिहिलं खास पत्र
'आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेलं बलिदान हे सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपुत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की, या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सानिध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल.
आपल्यावर कोसळलले दु:ख हे अपार आणि कठोर आहे. मात्र यातून आपण सावरुन धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई आणि त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती'.