"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 09:09 PM2024-09-23T21:09:16+5:302024-09-23T21:15:35+5:30

विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी करत काही सवाल उपस्थित केले आहेत. 

akshay shinde badlapur sexual assault accused shot dead vijay wadettiwar demand inquiry | "पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल

"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई : महिन्याभरापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला तळोजा तुरुंगातून बदलापूर येथे ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात येत असताना त्याने शेजारी असलेल्या पोलिसांची बंदूक हिसकाऊन घेत गोळीबार केला, त्यावेळी पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात अक्षयचा मृत्यू झाला असून पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान,  या प्रकरणावरून आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी करत काही सवाल उपस्थित केले आहेत. 

अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?, अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?, आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का?, त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? असे एका ना अनेक सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर अत्याचारातील आरोपीच्या एन्काऊंटरनंतर उपस्थित केले आहेत. याचबरोबर, बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच, बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी ट्विटवरुन केली आहे. 

दरम्यान, अक्षय शिंदे याने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, अलीकडेच कल्याण न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले. याखेरीज त्याच्या दोन पत्नींनी शिंदे याने त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या पत्नीने केलेल्या याच आरोपाची चौकशी करण्याकरिता सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत असताना त्याने पोलिसांच्या वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. 

यामध्ये मोरे यांच्या पोटाला व मांडीला इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे याने एकूण तीन राउंड फायर केले. मात्र, त्याच्या दोन गोळ्यांमध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिंदे जबर जखमी झाला. त्याला तातडीने कळवा येथील महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तो मरण पावल्याचे सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आले. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी वरील माहितीस दुजोरा दिला.
 

Web Title: akshay shinde badlapur sexual assault accused shot dead vijay wadettiwar demand inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.