आळंदीमध्ये भरदिवसा घरफोडी; दागिने लंपास
By admin | Published: September 18, 2016 12:56 AM2016-09-18T00:56:37+5:302016-09-18T00:56:37+5:30
मुलाला शाळेत सोडविण्यासाठी गेलेल्या कुटुंबाची घरफोडी करून सुमारे २० तोळे सोने आणि ३० हजारांची रोकड अज्ञात दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली़
पिंपरी : घर बंद करून, लॉक लावून मुलाला शाळेत सोडविण्यासाठी गेलेल्या कुटुंबाची घरफोडी करून सुमारे २० तोळे सोने आणि ३० हजारांची रोकड अज्ञात दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली़
आळंदी देवाची येथील पसायदान सोसायटीत सकाळी अकरा वाजता ही घटना घडली़ याबाबत श्रीकांत भानुदास तापकीर (वय ३६, रा़ पसायदान सोसायटी, आळंदी देवाची, ता़ खेड) यांनी आळंदी देवाची पोलीस ठाण्यात फि र्याद दिली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत यांच्या पत्नी जयमाला सकाळी लवकर कामाला गेल्या होत्या़ त्यामुळे मुलाला शाळेत सोडविण्यासाठी श्रीकांत यांनी सकाळी अकराच्या दरम्यान घर बंद करून लॉक लावले़ त्यांनी मुलाला सोसायटीजवळच असलेल्या शाळेत सोडले़ दुपारी बाराच्या सुमारास काम उरकल्यानंतर ते घरी परतले़ तेव्हा घराचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत आढळून आला़ त्यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता, घरातील बंद कपाटे उचकटून कोणी तरी अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सुमारे २० तोळे दागिने आणि ३० हजारांची रोकड चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले़ दोनच दिवसांपूर्वी श्रीकांत यांच्या पत्नी जयमाला तापकीर यांनी आपल्या वडिलांकडून इमारतीच्या बांधकामासाठी २० तोळे दागिने आणले होते़ त्याची चोरी झाल्याचे लक्षात येताच श्रीकांत यांनी आळंदी देवाची पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली़ पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़ या वेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते़ या वेळी शेजाऱ्यांनी पोलिसांना तीन लोक सोयायटीच्या आवारात संशयास्पद फिरत असल्याची माहिती दिली़ त्यानुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यास सुरुवात केली़ (प्रतिनिधी)
>वाढत्या दरोड्यांमुळे नागरिकांत भीती
भरदिवसा हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस ठाणे आणि गजबजलेला परिसर असलेल्या सोसायटीमध्ये घरफ ोडी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे़ आळंदी पोलिसांनी चोरट्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.