आळंदीत डेंगीने अभियंत्याचा मृत्यू
By admin | Published: September 18, 2016 12:44 AM2016-09-18T00:44:30+5:302016-09-18T00:44:30+5:30
सुरेंद्र सुभाष नाईकरे (वय ४० वर्षे, रा. वृंदावन कॉलनी, आळंदी) या खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या अभियंत्याचा पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू
आळंदी : डेंगीची लागण होऊन येथील अभियंते सुरेंद्र सुभाष नाईकरे (वय ४० वर्षे, रा. वृंदावन कॉलनी, आळंदी) या खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या अभियंत्याचा पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १५) घडली. सुरेंद्र हे पुणे जिल्हा काँग्रसेचे सरचिटणीस संदीप नाईकरे यांचे मोठे बंधू आहेत. त्यांच्या मागे आईवडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. नाईकरे यांना पाच-सहा दिवस ताप होता. येथील स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर, त्यांना मंगळवारी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रकृती अधिक खालवल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु, गुरुवारी दुपारी ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या वतीने मृत घोषित करण्यात आले.
आळंदी शहरात डेंगीच्या तापाची साथ पसरली असून, सुमारे चाळीस ते पन्नास रुग्ण खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर येत आहे.
पालिकेकडून शहर स्वच्छतेसाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च होत असतानाही डेंगीसारख्या साथीवर प्रतिबंध आणण्यात त्यांना अपयश येत आहे. त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने े ताप पसरण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे . (वार्ताहर)