आळंदीच्या तरुणी, क्या छोरों से कम हैं..?
By admin | Published: January 11, 2017 02:29 AM2017-01-11T02:29:30+5:302017-01-11T02:29:30+5:30
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात विशेष कामगिरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन पिंपरी, चिंचवड, भोसरी व आळंदी परिसरातील मुलींनी स्वत:ला खेळात
पिंपरी : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात विशेष कामगिरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन पिंपरी, चिंचवड, भोसरी व आळंदी परिसरातील मुलींनी स्वत:ला खेळात झोकून दिले आहे. कुस्ती, कबड्डी, हॉकी, नेमबाजी, अॅथलेटिक्स अशा विविध खेळ प्रकारांत मैदान गाजविणाऱ्या महिला खेळाडूंचा आदर्श घेऊन तरुणींचा खेळाकडे कल वाढला आहे. आळंदीच्या तालमीत कुस्तीच्या सरावासाठी येणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी तालमीत सराव करणाऱ्या अवघ्या तीन मुलींची संख्या आता ४५च्यावर गेली आहे.
आॅलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणाऱ्या अनिसा सय्यद,अंजली भागवत, राही सरनोबत यांच्यासह आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली तळेगावची हर्षदा जाधव, आंतरराष्ट्रीय धावपटू भाग्यश्री बिले यांचा आदर्श ठेऊन मुलींचा खेळाकडे ओढा वाढला आहे. कबड्डीत बाजी मारलेल्या दीप्ती जोसेफ, तसेच आशियाई स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या वडमुखवाडीची अंकिता गुंड अशा खेळाडूंमुळे पुणे जिल्ह्यातील तरुणींना खेळाबद्दलचे आकर्षण निर्माण झाले आहे. कुस्तीसारख्या मर्दानी खेळात महिलाही कमी नाहीत, हे हरियाणाच्या फोगट भगिनींनी पटकाविलेल्या पदकांनी सिद्ध झाले आहे. त्यावर ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला अहे. त्यामुळे तरुणींचा कुस्ती खेळाकडे कल वाढला आहे. आता पालकही मुलींना खेळाबद्दल प्रोत्साहन देऊ लागले आहेत. हा सकारात्मक बदल आहे, असे दिनेश गुंड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अंकिताने पटकावली १२ सुवर्णपदके
आळंदीत सुरू केलेल्या तालमीत राज्याच्या विविध भागातून मुली दाखल झाल्या आहेत. वडमुखवाडीतील गुंड कुटुंबाला कुस्ती या खेळाचा वारसा आहे. आशियाई स्पर्धेत पदक मिळविणारी अंकिता ही आमच्या तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी आहे. आशियाई स्पर्धेत अंकिता तीन वेळा सहभागी झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर तिने १२ सुुवर्णपदक मिळवले आहेत. मनीषा देवकर हिने राष्ट्रीय स्तरावर १२ सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. ज्युनिअर आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे.
सोनाली तोडकरने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. आशियाई कॅडेट स्पर्धेत तिचा सहभाग राहिला आहे. विजय पवार यांचा आशियाई कॅडेट स्पर्धेत सहभाग राहिला आहे. अश्विनी मडवी,तनुजा अल्हाट, शीतल साठे, हर्षदा जाधव या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
- दिनेश गुंड, कुस्ती प्रशिक्षक