अलंकापुरी भक्तिरसात चिंब..!
By admin | Published: June 18, 2017 12:25 AM2017-06-18T00:25:15+5:302017-06-18T00:25:15+5:30
श्रीविठ्ठल भेटीच्या ओढीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८७व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याने शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
भानुदास पऱ्हाड । लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : ‘‘अवघाची संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिन्ही लोक!!
जाईन गे माये तया पंढरपुरा!
भेटेन माहेर आपुलिया!!’’
श्रीविठ्ठल भेटीच्या ओढीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८७व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याने शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवले. देहभान विसरून ‘ज्ञानोबा-माउली-तुकारामां’चा जयघोष करीत लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. पंढरीकडे जाण्यासाठी लाखो महिला-पुरुष वारकरी दाखल झाल्याने ज्ञानियांच्या अलंकापुरीला भक्तिसागर लोटला होता.
प्रस्थान सोहळ्यास पहाटे ४ला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दूधआरती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी १२ला ‘श्रीं’ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारी सुरू झाली. प्रथम मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. त्यानंतर माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा पालखी सोहळा यांच्यातर्फे ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आले.
ग्रामस्थ, मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले.
तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या निनादात ‘ज्ञानोबा-तुकारामां’चा जयघोष करत फेर, फुगड्यांनी मंदिर परिसर दुमदुमून सोडला होता. वारकऱ्यांच्या उत्साहाला आनंदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृंदावन डोईवर घेऊन विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या महिला आणि तरुण वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. हा वैभवी सोहळा मंडप इमारतीत मुक्कामासाठी विसावला.
टाळ-मृदुंगाचा निनाद अन् ‘ज्ञानोबा तुकोबां’चा जयघोष
आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्य महाद्वारातून मानाच्या ४७ दिंड्याना मंदिरात प्रवेश दिल्यानंतर टाळ-मृदुंगाचा निनाद व ‘ज्ञानोबा तुकोबां’चा जयघोष अंगावर शहारे उमटवीत होता. फेर, फुगडी, मनोऱ्यामधून मनसोक्त बेभान होऊन वारकरी नाचत होते.
माउलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक
माउलींच्या १८७व्या पायीवारी प्रस्थानप्रसंगी पवमान अभिषेक, वेदघोष, समाधीवर माउलींच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले.
सुवासिक चंदन, अत्तर लावून माउलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधीवत पूजासमयी माउलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसत होते.
दृष्टिक्षेपात
- घंटानादाने पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ.
- वैष्णवांचा अलोट भक्तिसागर.
- पोलिसांचा चोख बंदोबस्त.
- इंद्रायणी काठावर रंगला भक्तांचा आनंदमेळा.