बारबाहेर आता ‘अल्कोबूथ’!
By admin | Published: January 13, 2016 02:51 AM2016-01-13T02:51:55+5:302016-01-13T02:51:55+5:30
दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून एक नामी शक्कल लढवण्यात आली आहे. बारमध्ये मद्यपान केलेल्या ग्राहकाच्या शरीरातील
मुंबई : दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून एक नामी शक्कल लढवण्यात आली आहे. बारमध्ये मद्यपान केलेल्या ग्राहकाच्या शरीरातील दारूचे प्रमाण तपासणारी ‘अल्कोबूथ’ मशिन मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सबाहेर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे त्या ग्राहकाला वाहन चालविण्यापासून रोखता येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. या मशिनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुंबईतील एनसीपीए येथे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमप्रसंगी करण्यात आले.
तळीराम चालक आढळल्यास वाहतूक पोलिसांकडून दोन हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते. तसेच याबाबत न्यायालयातही केस चालवून दंड आकारणी, लायसन्स जप्ती किंवा शिक्षा ठोठावली जाते. तरीही चालक दुर्लक्षच करतात. २0१५ मध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तब्बल १८ हजार ३५ जणांवर कारवाई करण्यात आली.
यात २१ ते २५ वयोगटातील ४ हजार ५१७ तर २६ ते ३0 वयोगटातील ५ हजार ४ तरुणांचा तर १८ ते २0 वयोगटातीलही ४८६ जणांचा समावेश आहे.
हे प्रकार रोखण्यासाठी बार अॅन्ड रेस्टॉरन्टबाहेर पडणाऱ्या ग्राहकाला वाहन चालवण्यापासून रोखण्यासाठी अल्कोबूथ नावाची मशिनच बार अॅन्ड रेस्टॉरन्टबाहेर बसविण्यात येणार आहे. एखाद्या ग्राहकाच्या शरीरात दारूचे प्रमाण जास्त असल्यास ही मशिन त्या प्रमाणाची माहिती देईल. ग्राहकाची बार अॅन्ड रेस्टॉरन्टच्या मालक-चालक किंवा कर्मचाऱ्यांकडूनच मशिनद्वारे तपासणी केली जाईल. मद्याचे प्रमाण जास्त असल्यास त्याला चालक किंवा टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्या बार अॅन्ड रेस्टॉरन्ट चालकांची असेल, असे वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.