अलर्ट ! केरळ, कर्नाटक व कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा शक्यता; हवामान विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 06:30 AM2020-09-20T06:30:42+5:302020-09-20T06:35:01+5:30
कोकणासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात २० ते २२ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता...
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र रविवारी तयार होत असून त्याचा परिणाम म्हणून केरळ, कर्नाटक व कोकण किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात २० ते २२ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या २४ तासात राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातील आटपाडी १४०, माळशिरस १०० मिमी तसेच मराठवाड्यातील औसा १३० मिमी पावसाची नोंद झाली होती.
२० सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार तर रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. २१ व २२ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
..........
पुणे शहरात पावसाने ओलांडली वर्षाची सरासरी
जूनपासून सातत्याने पडलेल्या पावसाने यंदा परिसरातील सर्व धरणे भरली असून पावसाळ्याच्या चार महिन्यांनी ११ दिवस बाकी असतानाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पुणे शहरात पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी ५६० मिमी पावसाची नोंद होते. तर वर्षभरात साधारण ७४० मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र १ जूनपासून आजअखेरपर्यंत ७४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.