औंढ्यात मंदिर सुरक्षिततेसाठी अलर्ट
By admin | Published: September 8, 2016 10:46 PM2016-09-08T22:46:12+5:302016-09-08T22:46:12+5:30
देशातील १२ ज्योतिर्लिंपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिर उडवून देणारे निनावी पत्र परभणी पोलिसांना मिळाले
ऑनलाइन लोकमत,
औंढा नागनाथ, दि. 8 - देशातील १२ ज्योतिर्लिंपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिर उडवून देणारे निनावी पत्र परभणी पोलिसांना मिळाले असून हिंगोली पोलिस विभागाने त्वरित मंदिराभोवती सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण आहे.
येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने परभणी पोलिस अधीक्षकांना हे मंदिर उडवून देणारे निनावी पत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने हिंगोली पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांनी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लावली असून मंदिराची सुरक्षा वाढविण्याचा सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंदिराच्या आत व परिसरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, फौजदार गिरीधारी कांबळे येथे आले आहेत.
मंदिराच्या चार दरवाजांपैकी एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने मंदिर संस्थानला दिल्या आहेत. तसेच मंदिरामध्ये नारळ व बॅग नेण्यास, नारळ फोडण्यास संस्थाननेही तात्काळ बंदी घेतली असून व्यवसायिकांनीही नारळ विक्री करू नये, अशा सूचना पोलिस व मंदिर प्रशासनाचा वतीने सचिव गजानन वाखरकर यांनी दिल्या आहेत. मंदिराच्या संपूर्ण भागाची तपासणी बॉम्बशोधक व नाशक पथकाचे सुनील नायक, तसेच एटीएसच्या पथकाने केली आहे. सतर्कता बाळगण्याचा सूचना पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांनी दिल्या आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका- पोलीस अधीक्षक
मंदिराबाबत निनावी पत्राद्वारे धमकी दिली असून ते पत्र कसे व कोठून आले याचा तपास गोपनीय शाखेकडून सुरू करण्यात आला आहे. मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसांना सूचना देवून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिक व भाविकांनी अशा अफवांना बळी पडू नये, परंतु संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना सूचना करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांनी केली आहे.