अधिकाऱ्यांना भोवणार हलगर्जी
By admin | Published: July 14, 2017 03:52 AM2017-07-14T03:52:35+5:302017-07-14T03:52:35+5:30
स्वा. विनायक दामोदर सभागृहाच्या छताचे पीओपी कोसळल्याच्या घटनेची चौकशी अतिरिक्त आयुक्त संजय घरत करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी मुख्यालयातील स्वा. विनायक दामोदर सभागृहाच्या छताचे पीओपी कोसळल्याच्या घटनेची चौकशी अतिरिक्त आयुक्त संजय घरत करणार आहेत. आठ दिवसांत त्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. दरम्यान, मागील महिन्यातील महासभा सुरू होण्याच्या आधी प्रेक्षक गॅलरीतील पीओपीचा काही भाग कोसळला होता. त्याची गांभीर्याने दखल घेतली असती, तर बुधवारचा प्रकार टाळता आला असता. परंतु, अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. तो आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे.
केडीएमसीची तहकूब सभा ७ जुलैला या सभागृहात झाली होती. महापालिका दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक बुधवारी या सभागृहात होणार होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी या सभागृहाची पाहणी करून त्यात पुरेशी तयारी करण्यात आली होती. परंतु, सभागृहाच्या छताला असलेले पीओपी सांगाड्यासह कोसळल्याचे अधिकाऱ्यांच्या बुधवारी सकाळी ९ वाजता निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच महापौर राजेंद्र देवळेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी सभागृहाची पाहणी केली. पीओपीचे छत कोसळण्यापूर्वी सभागृहात पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याची बाब महापौर व नगरसेवक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली होती. नगरसेवक आणि पदाधिकारी दोन वर्षांपासून सभागृहाच्या दुरुस्तीकडे वारंवार लक्ष वेधत होते. मात्र, त्याकडे पुरते दुर्लक्ष केले गेल्याने ही आपत्ती ओढवल्याचे बोलले जात आहे. यामुळे बांधकाम विभाग आणि देखभाल-दुरुस्ती करणारा कंत्राटदार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
२० मे २०१५ ला तत्कालीन सभागृहनेते कैलास शिंदे यांनी सभागृहाच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव सूचना मांडली होती. त्याला नगरसेविका वैजयंती गुजर-घोलप यांनी अनुमोदन दिले होते. यात त्यांनी सभागृहाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते. सभागृह बांधले तेव्हापासून त्याची कोणतीही डागडुजी झालेली नाही. सभागृहात सभा सुरू असताना काही वेळा तेथे खारूताई फिरत असताना दिसत होत्या. सभागृहाचे छत व पीओपीमधील रिकाम्या जागेत कबुतरांनी घरटे बांधून घाण केली होती. उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे सभागृहातील आतील भाग खराब झाला आहे. गच्चीतून पावसाळ्यात सभागृहात पाण्याची गळती होत असल्याने गच्चीवर कायमस्वरूपी शेड उभारण्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. सहाव्या मजल्यावरील टेरेसवर वॉटरप्रूफ्रिंग करा, ही कामे तातडीने पूर्ण करा, असा हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात सभापती संदीप गायकर यांनी महापालिका भवनच्या दुरुस्तीकामी एक कोटीची तरतूद केली होती. त्यात सभागृहाची दुरुस्ती, अॅकॉस्टिक वर्क, पाणीगळतीचे काम, प्रेक्षक गॅलरीत गळत असलेले काम, टेरेसवर कायमस्वरूपी छताचे काम तातडीने करावे, अशी मागणी गायकर यांनी तत्कालीन आयुक्तांकडे केली होती. परंतु, तरतूद करूनही या कामांकडे कानाडोळा करण्यात आला. तत्कालीन सचिव सुभाष भुजबळ यांनीही बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून सभागृहाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधल्याचे समोर आले आहे. ही बाब निदर्शनास आणूनही दुर्लक्ष का झाले, याचा खुलासा चौकशीत द्यावा लागणार आहे.
>कंत्राटदाराकडून
नुकसान वसूल करावे
संबंधित घटना पाहता जीवाशी खेळ खेळणाऱ्या बेजबाबदार व कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची व बडतर्फीची कारवाई व्हावी आणि या घटनेमुळे झालेले नुकसान देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराकडून वसूल करावे, अशी मागणी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी आयुक्त वेलरासू यांच्याकडे केली आहे.