आलिया म्हणजे अभिनयातील अमिताभ बच्चन - रणबीर कपूर
By admin | Published: April 11, 2017 08:55 PM2017-04-11T20:55:44+5:302017-04-12T09:58:46+5:30
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भटची मुलाखत घेण्यात आली
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - आलिया म्हणजे अमिताभ बच्चन आहे असं कौतुक अभिनेता रणबीर कपूरने केलं आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भटची मुलाखत घेण्यात आली. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच आलिया आणि रणबीर कपूर यांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुलाखत घेत दोघांना बोलते केले. मुलाखत घेण्याआधी दोघांनाही आऊटस्टॅडिंग एंटरटेनर पुरस्कारने गौरवण्यात आलं. युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
आलियाने पुरस्कार स्विकारल्यानंर मराठीत बोलत लोकमतचे आभार मानले. गेले कित्येक दिवस आपण हे वाक्य पाठ करत असल्याचंही तिने सांगितलं. मी मुंबईची मराठी मुलगी असल्याचा अभिमानही आलियाने व्यक्त केली.
रणबीरला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी ११ वर्षांचे होते. रणबीर संजय लीला भन्साळींना अस्टिस्ट करत होता. मला त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायचं होतं. पण त्यावेळी मला इतकी लाज वाटत होती. ‘सावरियां’मध्ये रणबीरला पाहिले अन् मी त्याच्यावर लट्टू झाले, असं आलियाने सांगितलं. रणबीरचा कोणता चित्रपट आवडला असं विचारलं असता ‘बर्फी’ आणि रॉकस्टरचं नाव आलियाने घेतलं. तसंच संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील त्याचं काम सर्वोत्तम असेल असा विश्वासही तिने व्यक्त केला.
तसंच रणबीरनेही आलियाचं कौतुक करताना "आलियाचा "हायवे" चित्रपट आपल्याला प्रचंड आवडला असल्याचं सांगितलं. तो चित्रपट पाहिल्यानंतर आलिया म्हणजे अमिताभ बच्चन असल्याचं मी मित्राला सांगितलं होतं", असंही रणबीरने सांगितलं.
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा