अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन; देशासह जागतिक बाजारपेठेत स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:36 AM2021-10-04T06:36:12+5:302021-10-04T06:36:26+5:30
केंद्राच्या पेटंट कार्यालयाकडून स्वीकृती, महाराष्ट्रात होणाऱ्या कांद्यांच्या विविध प्रकारांपैकी अलिबागच्या पांढऱ्या कांद्याने आपले वेगळे वैशिष्ट्य जपले आहे
अलिबाग : गेल्या अनेक वर्षांपासून लागवडीची परंपरा जोपासलेल्या अलिबागच्या गोड, पांढऱ्या कांद्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देण्याबाबत केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून तोंडी स्वीकृती देण्यात आली आहे. अलिबाग पांढरा कांदा उत्पादक संघाच्या नावाने जीआय प्राप्त झाल्याने अलिबाग तालुक्यातील कांद्याला आता देशासह जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या कांद्यांच्या विविध प्रकारांपैकी अलिबागच्या पांढऱ्या कांद्याने आपले वेगळे वैशिष्ट्य जपले आहे. मोत्यासारखा पांढरा शुभ्र, मोदकासारखा आकर्षक आकार, गोड चवीचा व विविध औषधी गुणधर्मांनी युक्त म्हणून या कांद्याची ओळख आहे. अलीकडील काळात ग्राहकांकडून म्हणूनच या कांद्याला पसंती मिळू लागली आहे. अलिबाग तालुक्याचे लागवडीखालील एकूण क्षेत्र १४ ते १५ हजार हेक्टर आहे. पैकी पांढऱ्या कांद्याखालील क्षेत्र २२० ते २३० हेक्टर आहे. ‘बॉम्बे प्रेसिडेन्स- कुलाबा’ गॅझेटच्या १८८३ च्या मूळ प्रतीत व २००६ च्या ‘ई बुक’ आवृत्तीत अलिबागमध्ये पांढरा कांदा लागवडीखाली असल्याचे ऐतिहासिक संदर्भ देण्यात आले आहेत. वाडवडिलांच्या आधीपासून येथील शेतकऱ्यांनी त्याचे शुद्ध बियाणे संवर्धित केले आहे. सात-आठ गावे पांढऱ्या कांद्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध असून, उत्पादकांची संख्या सहाशेहून अधिक आहे. अशा या कांद्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रायगड कृषी विभाग व पुणे येथील ‘जीएमजीसी’ कंपनीचे प्रमुख गणेश हिंगमिरे यांनी सामंजस्य करार केला होता. एकत्रित प्रयत्नांमधून १५ जानेवारी २०१९ ला ‘जीआय’साठी नोंदणी झाली. अलिबाग पांढरा कांदा उत्पादक संघही स्थापन करण्यात आला.
मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट रजिस्ट्रार कार्यालयात जीआय मिळण्याच्या दृष्टीने पडताळणी करण्यात आली. यावेळी कृषी विद्यापीठाच्या भौगोलिक निर्देशांक (जीआय) प्रकल्पाचे प्रमुख डॉ. जितेंद्र कदम, ‘आत्मा’चे कल्पेश पाटील, जीएमजीसीचे प्रमुख गणेश हिंगमिरे व शेतकरी उत्पादक संघाचे सदस्यही उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पांढरा कांदा आजपर्यंत जोपासला आहे. जीआय स्वीकृती मिळाल्याने आनंद तर झालाच, शिवाय हुरूपही वाढला आहे. सर्वांच्या एकत्रीकरणातून हे शक्य झाले आहे. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत या कांद्याचा प्रसार झाल्यास मागणी वाढून दरही चांगले मिळतील. - सचिन पाटील, अध्यक्ष, पांढरा कांदा उत्पादक संघ, अलिबाग