देशात योगाला सर्व वयोगटांतून मागणी
By Admin | Published: June 21, 2016 12:35 AM2016-06-21T00:35:46+5:302016-06-21T00:35:46+5:30
सध्या जिम, झुंबा, सालसा, अॅरोबिक्स यांसारख्या विविध व्यायामप्रकारांची चलती असतानाही तरुण आणि मध्यमवयीनांकडून योगाला मोठी मागणी आहे
पुणे : सध्या जिम, झुंबा, सालसा, अॅरोबिक्स यांसारख्या विविध व्यायामप्रकारांची चलती असतानाही तरुण आणि मध्यमवयीनांकडून योगाला मोठी मागणी आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शासकीय व खासगी संस्थांमधूनही या शास्त्राच्या प्रचारासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न होताना दिसत आहेत.
शारीरिक आणि मानसिक स्थिरतेसाठी उपयुक्त असणाऱ्या या शास्त्राचे कोणतेही अपाय नाहीत. तसेच योग्य त्या प्रशिक्षणाने हे शास्त्र आत्मसात करण्यात येते त्यामुळे सर्वच वयोगटातून या व्यायामप्रकाराला चांगलीच मागणी असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते.
काही कालावधीपूर्वी मागे पडलेले हे शास्त्र आता पुन्हा एकदा मोठ्या जोमाने पुढे आल्याचे योगाचे अभ्यासक असणारे अरुण दातार यांनी सांगितले. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी योगा हा विशिष्ट क्लासपुरताच मर्यादित होता मात्र आता तसे राहिलेले नाही. आता सर्व स्तरांत हा व्यायामप्र्रकार वापरला जातो. याबरोबरच सध्या असणाऱ्या सरकारचाही या शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यात मोठा वाटा आहे.
मात्र योगा या शास्त्राकडे पी हळद आणि हो गोरी या तत्त्वाने पाहणे उपयोगाचे नाही. हे समजून घेऊन, योग्य पद्धतीने अभ्यास करण्याचे आणि खोलवर जाणून घेण्याचे शास्त्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. सूर्यनमस्कारासारखा व्यायमप्रकार हा सर्वांगीण व्यायाम असून त्याचाही येत्या काळात मोठ्या प्रमाणात प्रचार होण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. मानसिक शांतीसाठीही योगाला पर्याय नाही असे योगतज्ज्ञ विनोद दुलाल म्हणाले. मात्र याबाबत योग्य तो अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. हे शास्त्र आपल्याकडील असून त्याला आपल्याच देशात हवी तितकी किंमत आजही दिली जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
तर महिलांच्या अनेक शारीरिक समस्यांसाठी योगासने हा उत्तम उपाय असल्याचे योगअभ्यासक विदुला शेंडे म्हणाल्या. सर्वांगसुंदर व्यायाम असून त्याने कोणतीही हानी होण्याची शक्यता नसते. कोणत्याही रोगाचे मूळ हे मनात असते आणि ते काढायचे काम योगा करते. या क्षेत्रात संशोधन होण्याची आवश्यकता असून येत्या काळात त्यात अधिकाधिक लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
(प्रतिनिधी)
यागोचा सध्या मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार होत असला तरीही हे शास्त्र योग्य पद्धतीने समाजापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. योग म्हणजे नेमके काय? हा व्यायामप्रकार कशासाठी करायचा? योगाचे प्रशिक्षक मोठ्या प्रमाणात सध्या तयार होत असून, त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. कोणीही उठून योगा शिक्षक झाल्याने या शास्त्राची गुणवत्ता खालावण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे. - विनोद दुलाल, योगप्रशिक्षक