माझ्यावरील सारे आरोप बिनबुडाचे; नाना पाटेकरने दिले सिंटाच्या नोटिसीला उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:34 AM2018-10-19T05:34:27+5:302018-10-19T05:34:38+5:30
मुंबई : तनुश्री दत्ताने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत, असे उत्तर नाना पाटेकर यांनी सिने अॅण्ड ...
मुंबई : तनुश्री दत्ताने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत, असे उत्तर नाना पाटेकर यांनी सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) पाठविलेल्या नोटिसीच्या उत्तरात म्हटले आहे. तनुश्रीवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या आपण सुरू केली आहे, असेही नानाने सिंटाला कळवले आहे.
आलोकनाथ यांची ‘हजेरी’
विनता नंदा यांच्याविरोधात केलेल्या अब्रुनुकसानभरपाई दाव्याच्या सुनावणीवेळी आलोकनाथ स्वत: गैरहजर राहिल्याने दिंडोशी न्यायालयाने त्यांचीच हजेरी घेत त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. विनता नंदा यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याचीही न्यायालयाने परवानगी दिली.
श्वेता पंडितची तक्रार
मी टूच्या वादळात संगीतकार अनू मलिकचे नाव आले आहे. गायिका सोना महापात्रानंतर गायिका श्वेता पंडितनेही अनू मलिक यांच्यावर गाणे गाण्यासाठी किस मागितल्याचा आरोप केला आहे. नवोदित गायिकांना अनू मलिकपासून सावध राहण्याचा इशाराही श्वेता पंडितने दिला.
साजिद खानच्या व्हिडीओने खळबळ
‘मी टू’च्या वादळात अडकलेला दिग्दर्शक साजिद खान याची जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. आपण महिलांशी किती वाईट प्रकारे वागायचो, हे साजिद खानने या मुलाखतीत सांगितले आहे. विशीत असताना मी मुलींना, महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिली. त्या वेळी माझे बरेच अफेअर्स होते. मी तेव्हा अतिशय वाईट माणूस होतो, असे साजिदने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.