कला संचालनालय सीईटीचे सर्व गुणपत्रिका पुन्हा तपासणार
By Admin | Published: June 24, 2016 10:08 PM2016-06-24T22:08:28+5:302016-06-24T22:08:28+5:30
कला संचालनालयातर्फे राबवण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) निकालावरून संचालनालयावर नामुष्की ओढवली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी निकालावर संशय
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२४ - कला संचालनालयातर्फे राबवण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) निकालावरून संचालनालयावर नामुष्की ओढवली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी निकालावर संशय व्यक्त करत आंदोलन केल्याने सर्वच उत्तरपत्रिका नव्याने तपासण्याचा निर्णय संचालनालयाला घ्यावा लागला आहे. त्यासाठी प्रशासनाने नवीन समिती नेमली असून फेरतपासणीची यादी २ जुलै रोजी घोषित करण्यात येणार आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीमधील एका विषयात केवळ १५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थ्यांना इतर विषयांत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारत गुणपत्रिका पुन्हा तपासण्याची मागणी केली होती. आंदोलनाची दखल घेत, प्रशासनाने अनुत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासल्या. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांच्या गुणांत कमालीची
वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. म्हणूनच प्रशासनाने या परीक्षेस बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका नव्या समितीकडून तपासण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, संचालनालयाने घेतलेला पहिला कॅप राऊंड रद्द करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी भारती संघटनेच्या विजेत्या भोनकर यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिवाय फेरतपासणीच्या नावाखाली प्रशासनाकडून उकळण्यात येणारे २ हजार रुपये शुल्क कमी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. शिवाय फेरतपासणीत गुणांसोबतच गुणपत्रिकेचीही प्रत देण्याची तरतूद करावी, असे आवाहन केले आहे.
प्रवेश प्रक्रियेचे नवे वेळापत्रक -
आत्ता सर्व गुणपत्रिका तपासल्यानंतर २ जुलैला सायंकाळी ४ वाजता अंतिम
गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
४ ते ८ जुलैदरम्यान पहिला कॅप राऊंड होईल.
१२ जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होईल.
१८ ते २१ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येतील.
२५ जुलैला दुसऱ्या कॅप राऊंडसाठी शिल्लक जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
२८ ते ३० जुलैदरम्यान कॅप राऊंड २ साठी आॅनलाईन अर्ज सादर करता येतील.
४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता कॅप राऊंड २ची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होईल.
५ ते ९ आॅगस्टदरम्यान कॅप राऊंड २ मधील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येतील.
१२ आॅगस्टला कॅप राऊंड ३ मधील रिक्त जागा प्रसिद्ध होतील.
१८ आॅगस्टला कॅप राऊंड ३ साठी शिल्लक जागांसाठी समुपदेशन केले जाईल.
१९ ते २३ आॅगस्टदरम्यान प्रवेश निश्चितीसाठी समुपदेशन केले जाईल.
२६ आॅगस्टला शिल्लक जागा प्रसिद्ध होतील.
३० आॅगस्टला प्रवेशाची कट आॅफ.