रक्तातील सर्व ‘कम्पोनंट’आता देशातच शक्य

By admin | Published: August 14, 2014 01:17 AM2014-08-14T01:17:40+5:302014-08-14T01:17:40+5:30

सार्वजनिक उपचार आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या उद्देशाने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या रक्तातील विविध (कम्पोनेंट) घटक आता विदेशातून आयात करावे लागणार नाही.

All the components in the blood are now possible in the country | रक्तातील सर्व ‘कम्पोनंट’आता देशातच शक्य

रक्तातील सर्व ‘कम्पोनंट’आता देशातच शक्य

Next

प्लाज्मा फ्रेक्सिनेशन सेंटरची निर्मिती : ६०० कोटींचा खर्च वाचणार
नागपूर : सार्वजनिक उपचार आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या उद्देशाने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या रक्तातील विविध (कम्पोनेंट) घटक आता विदेशातून आयात करावे लागणार नाही. कारण रक्तातील सर्वच प्रकारचे घटक आता आपल्या देशातच तयार केले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारतर्फे देशातील चारही मेट्रो ब्लड बँकेमध्ये प्लाज्मा फ्रेक्सिनेशन सेंटर स्थापन करण्यात येत आहे. यातून वर्षाला तब्बल ६०० कोटी रुपयांची बचत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या एड्स कंट्रोल विभाग (रक्त संक्रमण सेवा)चे उपमहासंचालक आणि राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद नवी दिल्लीचे संचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी मेडिकलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत दिली.
डॉ. खापर्डे यांनी सांगितले की, रक्ताद्वारे विविध घटक तयार केले जातात. परंतु आपल्या देशात सर्वच प्रकारचे घटक होत नाही. काही मोजके घटक सोडले तर इतर घटक हे विदेशातूनच मागविले जातात. देशात त्यामुळे वर्षाला जवळपास ६०० कोटी रुपये खर्च होतात. रक्ताची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यावरील प्रक्रियेवरही लक्ष घातले आहे. देशात मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथे मेट्रो ब्लड बँक आहेत. या रक्तपेढ्यांद्वारे त्या त्या राज्यांना आणि परिसरातील इतरही प्रदेशांना रक्तपुरवठा होत असतो या केवळ रक्तपेढ्या नसून त्या वैद्यकीय शिक्षण संस्थासुद्धा आहेत. त्यामुळे या चारही ठिकाणी प्लाज्मा फ्रेक्सिनेशन सेंटर स्थापन करण्याची योजना आहे. त्यापैकी दिल्ली व चेन्नईसाठी मंजुरी मिळाली असून याठिकाणी लवकरच सेंटर सुरू होईल. हे सेंटर सुरू झाल्याने देशातील रुग्णांना त्याचा लाभ होईलच परंतु वैद्यकीय शिक्षण व संशोधनालाही चालना मिळेल. इतकेच नव्हे तर देशाचे वर्षाकाठी खर्च होणारे ६०० कोटी रुपयेसुद्धा वाचतील. पत्रपरिषदेला इन्स्टिट्यूट आॅफ मेडिसिन सायन्स त्रिवेंद्रम येथील डॉ. देबाशिष गुप्ता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, डॉ. पराते प्रामुख्याने उपस्थित होते.
मेडिकलमधील ‘ब्लड कम्पोनेंट युनिट’ अपग्रेड होणार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेडिकल) रक्त घटक तयार करणारे युनिट आहे. हे युनिट येत्या वर्षभरात स्वतंत्र करून अत्याधुनिक करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा यावेळी देण्यात आली.
नियमित रक्तदात्यांची फळी तयार व्हावी
देशात रक्तदानाबाबत कमालीची उदासीनता आहे. देशातील रक्तपेढींची वर्षाला १ कोटी २० लाख युनिट रक्ताची गरज आहे. परंतु आतापर्यंत केवळ ९३ लाख युनिट रक्त गोळा झाले आहे. दरवर्षी हीच स्थिती असते. रक्तदान वाढविण्याच्या दृष्टीने सरकारने जनजागृतीवर भर दिला आहे. त्याअंतर्गत २०१७ पर्यंत ९० टक्के रक्तदानाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. परंतु यातून रक्ताच्या कमतरेची समस्या सुटणार नाही. एक दोनदा रक्त देण्याऐवजी नियमितपणे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची फळी निर्माण झाली तर देशातील रक्ताची कमतरता नाहीशी होईल, असे डॉ. देबाशिष गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Web Title: All the components in the blood are now possible in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.