शिल्पा शेट्टीसह पाचही संचालकांना सशर्त जामीन
By admin | Published: May 21, 2017 02:11 AM2017-05-21T02:11:09+5:302017-05-21T02:11:09+5:30
भिवंडीमध्ये दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणात ठाणे न्यायालयात सुनावणी सुरू असताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी तक्रारदारास धमकावल्याचा
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडीमध्ये दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणात ठाणे न्यायालयात सुनावणी सुरू असताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी तक्रारदारास धमकावल्याचा मुद्दा शनिवारी पुन्हा सुनावणी दरम्यान उपस्थित झाला. यावेळी आरोपी संचालकांपैकी दर्शित शहा यांना तक्रारदार रवी भलोटिया यांची माफी मागण्यास न्यायालयाने भाग पाडले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने पाचही आरोपींचा सशर्त जामीन अर्ज मंजूर केला. मात्र तक्रारदार किंवा साक्षीदार यांना कुणीही धमकावू नये, असा सज्जड इशारा न्यायालयाने दिला.
अभिनेत्री शेट्टी आणि त्यांचे पती कुंद्रा यांच्यासह बेस्ट डिल टीव्ही या होम शॉपिंग कंपनीच्या पाच संचालकांविरूद्ध भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी मागील महिन्यात गुन्हा दाखल केला होता. शनिवारी सकाळी ११ वाजता जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी सुरु झाली त्यावेळी सरकारी वकील विनित कुळकर्णी यांनी भलोटियांच्या धमकींचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत जामीन मंजूर करण्यास विरोध दर्शविला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संगीता खलिपे यांनी भलोटियांकडे धमकीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी त्याबाबत माहिती देताच आरोपी संचालकांपैकी न्यायालयात हजर दर्शित शहा यांना भलोटिया यांची माफी मागण्यास न्यायालयाने भाग पाडले.
मुंबई न सोडण्याची अट
सायंकाळी न्यायालयाने शिल्पा आणि राज यांच्यासह पाचही संचालक आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या. त्यानुसार तपास पूर्ण होईपर्यंत आरोपींनी ठाणे जिल्हा तसेच त्यांचे वास्तव्य असलेला मुंबई जिल्हा पूर्वपरवानीशिवाय सोडू नये, तपासात पोलिसांना सहकार्य करावे आणि तक्रारदार किंवा साक्षीदारांना धमकावू नये, असे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले. आरोपींच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली.