शेळके खुनातील पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी
By Admin | Published: October 31, 2016 01:35 AM2016-10-31T01:35:45+5:302016-10-31T01:35:45+5:30
शेळके खूनप्रकरणातील पाच आरोपींची पोलीस कोठडीची रविवारी मुदत संपल्याने त्यांना वडगाव मावळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खूनप्रकरणातील पाच आरोपींची पोलीस कोठडीची रविवारी मुदत संपल्याने त्यांना वडगाव मावळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
बंटी ऊर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (वय ३५ रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ, जि. पुणे), संदीप सोपान पचपिंड ( वय ३० रा. आंबी, ता. मावळ, जि. पुणे), खंडू ऊर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड (वय ३० रा. माळवाडी, ता. मावळ, जि. पुणे),आकाश दीपक लोखंडे (वय २१, रा.जोशीवाडा, तळेगाव दाभाडे ) व दत्तात्रय ज्ञानेश्वर वाघोले ( वय २२ , ठाकरवाडी, इंदोरी ) अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपीची नावे आहेत.
पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी रविवारी (दि. १६ आॅक्टोबर) सकाळी येथील खांडगे पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर सचिन शेळके यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली. शेळके खून प्रकरणातील श्याम दाभाडेसह त्याचे सहा साथीदार फरारी आहेत. तर आठ जण पोलीस कोठडी भोगत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत बाबर करीत आहेत. (वार्ताहर)