तुळापूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत
By admin | Published: May 18, 2016 01:26 AM2016-05-18T01:26:08+5:302016-05-18T01:26:08+5:30
श्रीक्षेत्र तुळापूर माझ्या मतदारसंघातील महत्त्वाचे गाव असल्याने या गावाची विविध विकासकामे झपाट्याने झाली पाहिजेत.
लोणीकंद : छत्रपती संभाजीमहाराजांची बलिदान भूमी, त्रिवेणी संगम असलेले श्रीक्षेत्र तुळापूर माझ्या मतदारसंघातील महत्त्वाचे गाव असल्याने या गावाची विविध विकासकामे झपाट्याने झाली पाहिजेत. त्यासाठी निधी कमी पडू देणाार नाही, असे आश्वासन शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिले.
तुळापूर (ता. हवेली) येथे सुमारे ८३ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार पाचर्णे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद अध्यक्षस्थानी होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब सातव, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश कुटे, शिरूर तालुकाध्यक्ष भगवान शेळके, ज्ञानेश्वर वाळके, बाळासाहेब चव्हाण, रवींद्र कंद, सुभाष जगताप, अप्पासाहेब बेनके, बाबासाहेब दरेकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, गणेश पुजारी, राहुल राऊत आणि सरपंच रूपेश शिवले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचर्णे म्हणाले, ‘‘रस्ता कॉक्रिटीकरण, शालेय वर्गखोल्या बांधकाम, पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटारे, सभागृह आदी कामे आपण आज करीत आहोत. ही कामे दर्जेदार व उत्कृष्ट होतील, याकडे गावाच्या नेतृत्वाने लक्ष द्यावे तसेच गावासाठी व परिसरासाठी लोकहिताचा विचार करून विविध कामांना प्राधान्य देण्यात येईल.’’
कंद म्हणाले, ‘‘तुळापूरचे नेतृत्व युवा पिढीकडे आल्याने गावाच्या विकासकामांना अधिक वेग येणार असून, स्वत:चे गाव समजून या गावाच्या विकासासाठी अधिक लक्ष देईन.’’ उपसरपंच अमोल शिवले यांनी स्वागत केले. सरपंच रूपेश शिवले यांनी प्रास्ताविक केले. संतोष शिवले यांनी सूत्रसंचालन केले.