अखिल भारतीय साहित्य संमेलनच हवे
By admin | Published: April 27, 2016 03:42 AM2016-04-27T03:42:59+5:302016-04-27T03:42:59+5:30
कल्याण-डोंबिवलीमध्ये आम्हाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच हवे आहे.
मुरलीधर भवाऱ, प्रज्ञा म्हात्रे
कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये आम्हाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच हवे आहे. विभागीय संमेलनाची मसापच्या जिल्हा प्रतिनिधींची भूमिका आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्टोक्ती कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व कवी राजीव जोशी यांनी केली. सांस्कृतिक नगरी असलेल्या कल्याण-डोंबिवलीत केव्हाच साहित्य संमेलन व्हायला हवे होते. तशी मागणी आतापर्यंत का केली गेली नाही, याबाबत अनेक प्रतिथयश साहित्यिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
जोशी म्हणाले की, आमच्या संस्थेने अ. भा. साहित्य संमेलनाचे यजमानपद स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आमचा विभागीय साहित्य संमेलनास ठाम विरोध आहे. संमेलन कार्यकारिणीचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश देशपांडे यांनी कल्याणमध्ये संमेलन व्हावे या मागणीला दुजोरा देतानाच अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले नाही तर किमान विभागीय साहित्य संमेलन तरी व्हावे, अशी कचखाऊ भूमिका ‘लोकमत’कडे व्यक्त केली होती. जोशी यांनी सांगितले की, कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय १५० वर्षाचे आहे. कल्याणला दीडशे वर्षांचा इतिहास आहे. कल्याणचा गायन समाजही तितकाच जुना आहे. कल्याणमध्ये अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्था आहेत. त्यामुळे त्याठिकाणी विभागीय संमेलन घेऊन काय उपयोग? कोमसापचे विभागीय संमेलन आम्ही केव्हाही घेऊ शकतो.
कवीवर्य अशोक बागवे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत जिल्हा प्रतिनिधींनी काही केलेले नाही. परंतु डोंबिवलीत साहित्य संमेलन व्हायला हरकत नाही.
कल्याणच्या वाचनालयाचे सरचिटणीस व लेखक भिकू बारस्कर यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून सार्वजनिक वाचनालयातर्फे साहित्य संमेलन कल्याणमध्ये व्हावे अशी मागणी केली जात आहे. पहिल्या वर्षी आमच्या अर्जाचा विचारच केला गेला नाही. त्यानंतर संमेलनासाठी पंजाबमधील घुमानची निवड झाली. त्यावेळी प्रतिनिधी कल्याणला पाठवू असे कार्यकारिणीकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात प्रतिनिधी पाठविलाच गेला नाही. गेल्या वर्षीचे संमेलन पिंपरी-चिंचवडला झाले. आमच्या मागणीचा विचार तिसऱ्या वेळीही करण्यात आला नाही. आता पुन्हा मागणी केली आहे.आम्ही आमचा संमेलन आयोजनाचा हट्ट सोडलेला नाही.
कवी व लेखक डॉ. महेश केळुस्कर म्हणाले की, साहित्य संमेलनाचा खर्च वाढतच चालल्याने आयोजकांवर एकीकडे दडपण येत असताना दुसरीकडे आयोजनाकरिता स्पर्धा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये साहित्य संमेलन व्हावे ही मागणी रास्त आहे. संमेलनाचा वाढता खर्च पाहता ज्यांच्यात ते यशस्वी करून दाखवण्याची धमक आहे अशा तरुणांनी मसापच्या जिल्हा प्रतिनिधीपदी निवडून यायला हवे. अनेक संस्था संमेलनाच्या अर्थकारणाला घाबरुन जबाबदारी घेत नाहीत. येथे वेगळे चित्र आहे. साहित्य संमेलनाच्या अर्थव्यवहारात आणि संमेलनाच्या व्यवहारात पारदर्शकता निर्माण होणे हेही गरजेचे आहे.
कल्याण याज्ञवल्क्य संस्थेचे अध्यक्ष दिलीप बल्लाळ यांनीही संमेलन आयोजनाच्या मागणीस पाठिंबा दिला. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
>साहित्यिक सतीश सोळांकुरकर यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीमध्ये पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. या ठिकाणी साहित्य संमेलन घेण्याची मागणी इतके वर्षे का केली नाही याचे आश्चर्य वाटते. साहित्य संमेलनाचा आग्रह जिल्हा प्रतिनिधींनी धरायला हवा होता. शहरात संमेलनाला लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. सांस्कृतिक परंपराही जपलेली आहे. त्यामुळे कुठेतरी जिल्हा प्रतिनिधीच कमी पडले आहेत, अशी तिरकस आणि कडवट टीकाही त्यांनी केली आणि आतातरी संमेलनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.