सर्व भारतीय भाषांमध्ये निनादणार पसायदानाचे सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 07:00 AM2019-07-03T07:00:00+5:302019-07-03T07:00:06+5:30
‘आता विश्वात्मके देवे! येणे वाग्यज्ञे तोषावे! तोषोनि मज द्यावे, पसायदान हे!’ हे पसायदानाचे सूर आजही शांतता आणि प्रसन्नतेचा संदेश देतात...
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : अवघ्या जगातील शांततेसाठी, प्रत्येक माणसाच्या सुखासाठी विश्वात्मकाकडे करण्यात आलेली मागणी अर्थात पसायदान! या विश्वप्रार्थनेचे सूर आता सर्व भारतीय भाषा आणि प्राचीन भाषांमध्येही निनादणार आहेत. यासाठी पसायदानाचा २५ भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार असून दृकश्राव्य माध्यमात गायनाचे चित्रिकरणही करण्यात येणार आहे.
‘आता विश्वात्मके देवे! येणे वाग्यज्ञे तोषावे! तोषोनि मज द्यावे, पसायदान हे!’ हे पसायदानाचे सूर आजही शांतता आणि प्रसन्नतेचा संदेश देतात. तत्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम या विश्वप्रार्थनेमध्ये पहायला मिळतो. सरहद या संस्थेतर्फे वैश्विक शांततेचा संदेश देण्यासाठी पसायदानाचा २२ भारतीय भाषा, तसेच पाली, प्राकृत आणि अर्धमागधी या भाषांमध्ये अनुवाद करण्याचा निर्णय हाती घेण्यात आला आहे. एकीकडे देश दहशतवादाला, अस्वस्थतेला, अशांततेला सामोरा जात असताना समाजाला ‘तिमिरातूनी तेजाकडे’ नेण्यासाठी पसायदानाच्या अनुवादाची संकल्पना मूर्त रुपात साकारली जाणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या पार्श्वभूमीवर शमीमा अख्तर या काश्मिरी तरुणीने मराठीमध्ये गायलेले पसायदान सर्वांनाच भावले. या अनोख्या प्रयोगाला उत्तम प्रतिसादही लाभला. हा प्रयोग करत असतानाच पसायदानाच्या अनुवादाचा प्रयोग हाती घेण्यात आला. त्यासाठी विविध भाषांंमधील अनुवादक, कवी, संगीतकार यांच्याशी संपर्क साधण्यात आला. २२ भारतीय भाषांमध्ये आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी आदींचा समावेश आहे. यापैकी पाच भाषांंमधील अनुवाद पूर्ण झाला आहे.
‘लोकमत’शी बोलताना सरहदचे संस्थापक संजय नहार म्हणाले, ‘महाराष्ट्राने देशाला कायमच शांततेचा मार्ग दाखवला आहे. महाराष्ट्र ही संत-महात्म्यांची भूमी आहे. सध्या देश अस्वस्थता, अशांततेच्या खाईत अडकला आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याची हीच खरी वेळ आहे. हीच गरज लक्षात घेऊन पसायदान या विश्वप्रार्थनेच्या अनुवादाची संकल्पना समोर आली. ख्वाजा सय्यद, नजहर सिद्दीकी, विक्रम सिंग आदींच्या सहकार्याने या संकल्पनेला मूर्त रुप देण्याचे काम सुरु आहे. सध्या १२ भाषांंमधील अनुवादक आणि संगीतकारांशी अंतिम स्तरावर बोलणी झाली आहेत. सध्या पाच भाषांमधील अनुवाद पूर्ण झाला असून ऑडिओ रेकॉर्डिंग, शूटिंगचे काम सुरु आहे.’
‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गाण्याच्या धर्तीवर पसायदानाचे सर्व भाषांमध्ये एकत्रीकरण करुन पाच ते सात मिनिटांचा व्हिडिओ तयार करता येईल का, याबाबतही विचार सुरु आहे. सर्व भाषांमधील गायकांकडून मराठीत पसायदान गाऊन घेणे किंवा प्रत्येक भाषेत एक ओळ आणि मराठीमध्ये पहिली तसेच शेवटची ओळ अशा विविध पर्यायांवर विचार सुरु आहे.
.............
अशांततेकडून शांततेकडे, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्यासाठी संगीत हा उत्तम उपाय आहे. सरहदतर्फे शासनाला २००८ मध्ये संगीत विद्यापीठाचा प्रस्तावही देण्यात आला होता. काही कारणांनी प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. पसायदानाच्या माध्यमातून शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरु आहे. २२ भारतीय भाषांमध्ये आणि तीन प्राचीन भाषांमध्ये अनुवाद करुन गायन केले जाणार आहे.
- संजय नहार, संस्थापक, सरहद