सर्वच नेत्यांना सोईच्या उमेदवाराचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 01:47 AM2016-10-19T01:47:31+5:302016-10-19T01:47:31+5:30

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले

All the leaders searched for the comfort candidate | सर्वच नेत्यांना सोईच्या उमेदवाराचा शोध

सर्वच नेत्यांना सोईच्या उमेदवाराचा शोध

Next


रहाटणी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून, सोईचा उमेदवार शोधण्याची धडपड सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये सध्या सुरू आहे. त्यातूनच इतर पक्षांतील प्रभावी चेहरे आयात करण्यावरही भर दिला जात असून, या निवडणुकीत उमेदवारीत निष्ठेपेक्षा पैसाच भारी ठरणार, असे चित्र दिसत आहे.
शहरातील १२८ उमेदवारांची निवड करताना राजकीय पक्षांचा कस लागत असताना आता आयात उमेदवारांवर भर दिला जात आहे. त्यातूनच काठावर असलेल्यांनी पक्षांतराला सुरुवात केली आहे. आपल्या पक्षाच्या गळाला कोणता मोठा मासा लागेल, यासाठी सर्वच पक्षांतील दिग्गज मंडळी जिवाचा आटापिटा करताना दिसून येत आहेत. कोण कोणत्या पक्षात जातो यावरूनच निवडणुकीचे गणित ठरणार आहे.
महापालिका निवडणुका आल्या, की अनेक पक्षांच्या अंतर्गत गटातटांचा संघर्ष उफाळू लागतो. माझा गट प्रभावी की त्याचा हे सिद्ध करण्यासाठी पक्षांतर्गत शक्ती प्रदर्शन घडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. एखाद्या गटाला जास्त जागा जाऊ नयेत म्हणून देखील कुरघोडीचे राजकारण होताना दिसून येत आहे. सध्या काही पक्षात उमेदवार आयात करण्याकडे भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
बरेचदा पक्षातील प्रस्थापित नेत्याला आपल्याच पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची डोकेदुखी नको म्हणून नवीन चेहरा लादला जातो. स्वत:ची राजकीय उंची वाढविण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांचे पंख छाटणे हा सर्वात प्रभावी फंडा राहिला आहे. याही निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
दसरा-दिवाळीच्या मूहूर्तावर अनेकांनी आपापल्या प्रभागांमध्ये आपल्या वजनाची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. या गोष्टीकडेही वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची नजर असणार आहे. त्यातून आपल्या सोयीचा चेहरा निवडणे सोपे जाणार आहे.
याशिवाय दावेदारीसाठी विजयाचे गणित जुळविताना जातीय समीकरणासोबतच आर्थिक सुबत्ता हा महत्त्वाचा निकष आहे. यापुढे पक्षनिष्ठा, जनसंपर्क, सामाजिक जीवनातील वर्तणूक या बाबींना गौण स्थान दिले जात आहे.
महिला आरक्षण असलेल्या ठिकाणी उमेदवार महिलेपेक्षा
त्यांच्या पतिराजाचे राजकीय वजन तपासले जात आहे. यातूनच पक्षांतराची प्रक्रियाही जोर धरत
आहे. (वार्ताहर)
>नाकापेक्षा मोती जड
राजकारणात आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा नको, आपलेच सर्वत्र वर्चस्व हवे अशी इच्छा शहरातील अनेक दिग्गज राजकारण्यांची आहे. त्यामुळे बरोबरीच्या एखाद्याने पक्षात प्रवेश केला, तर तो आपल्याला जड होणार नाही, याची खातरजमा काही मंडळी करत असल्याची चर्चा सध्या शहरात आहे. मागून आला अन् तिखट झाला अशी म्हणायची वेळ येऊ नये, म्हणून काहीजण सावध भूमिका घेत आहेत. पालिका हद्दीत जमिनीला सोन्याचे भाव आल्याने अनेकांकडे अमाप पैसा आहे .
इच्छुकांचे फुटले पेव
काहीजण फक्त पैसाच्या जोरावर निवडणुकीची तयारी करताना दिसून येत आहेत. परवापर्यंत राजकारणाचा गंध नसणाऱ्यांचे सध्या ठिकठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून बॅनर झळकू लागले आहेत. तर काहींनी प्रभागरचनेनंतर दुसऱ्याच प्रभागात काम व प्रचार सुरू केल्याने अनेक पक्षांत आताच बंडाळी सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही जण फक्त त्या प्रभागातील इच्छुक उमेदवारावर प्रभाव टाकून आर्थिक देवाणघेवाण करून पाठिंबा जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.
>वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी वाढला संपर्क
सध्या शहरातील अनेक मंडळी विविध पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या संपर्कात आहेत. पक्ष कोणताही असोे; मात्र मला नगरसेवक होणे आहे, अशी अनेकांची भावना झाल्याने अनेकांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. या निमिताने लवकरच शहरात पक्षांतर सोहळे सुरू होतील आणि त्या पाठोपाठ उमेदवारीची घोषणा होईल. शहरातील काँग्रेसचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली असल्याने त्या त्या प्रभागातील इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. ते पक्षात आले तर आपले काय अशी भीती निर्माण झाल्याने ते आपल्या पक्षात कसे येणार नाहीत यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.
सदस्य नोंदणीला सुरुवात
राष्ट्रीय पक्षासह प्रादेशिक पक्षांकडून सदस्य नोंदणीचे आकडे अभिमानाने सांगितले जातात. प्रत्यक्षात मात्र कोणता पक्ष शहरातील कोणत्या भागापर्यंत पोहोचला हे निवडणुकीत उमेदवारी देताना दिसून येते. पक्ष संघटनातील उणिवा खऱ्या अर्थाने निवडणूक काळात उमेदवार देताना अधोरेखित करता येतात. काही पक्षांना उमेदवार मिळणेही कठीण आहे.

Web Title: All the leaders searched for the comfort candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.