सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:40 IST2025-02-06T11:38:58+5:302025-02-06T11:40:09+5:30
"समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. हे ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही"

सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
आष्टी/कडा (जि. बीड) : राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे वीज बिलाचा बोजा शेतकऱ्यांवर येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
छत्रपती संभाजीनगर आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३ अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन कामाची पाहणी, तसेच बोगदा कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदामंत्री डाॅ. राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता मुंदडा, आ. विजयसिंह पंडित, आ. नारायण पाटील, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जी १६ हजार मेगावॅट वीज लागते ती सर्व सोलरवर घेतली जाईल. याचे काम डिसेंबर २०२५ किंवा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे आठ रुपये युनिटऐवजी तीन रुपयांनी वीज मिळून पाच रुपये वाचतील. या वाचलेल्या पैशांतून घरगुती, औद्योगिक वापराची बिले कमी करू.
पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही
समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. हे ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल. एवढेच नव्हे तर चार नदीजोड प्रकल्पांमुळे मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रदेखील दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही
सरपंच परिषदेचे काही लोक भेटले. संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या खपवून घेणार नाही. यात कोणीही असले तरी त्यावर कारवाई करणार. तसेच नवीन बीड तयार करायचे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले.
आमदार सुरेश धस म्हणाले, ‘मी मुख्यमंत्र्यांचा लाडका’
ठरावीक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तींना पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली, पण संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली कणखर भूमिका सर्वांना आवडली.
फडणवीस हे बिनजोड पहिलवान आहेत. प्रशांत बंब जसे लाडके आहेत, तसेच मीपण मुख्यमंत्र्यांचा लाडकाच आहे, असे आ. सुरेश धस यावेळी म्हणाले. तसेच राख, वाळू, गुटखामाफियांवर मकोका लावावा, अशी मागणीही आ. धस यांनी केली.
‘मेरा वचन ही मेरा शासन’
धस यांनी भाषणात ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेख केला. त्याचा धागा पकडत मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी धस मला शिवगामी म्हणत होते. शिवगामीचे ‘मेरा वचन ही मेरा शासन है’ हे वाक्य होते. त्यामुळे हेच माझे शासन आहे. बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही. मी येणार नाही, असे अनेकांना वाटले. परंतु, मीपण मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे. म्हणूनच तर हेलिकॉप्टरमधून आले.