माझ्यासोबत अख्खा गँगवॉर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2015 03:05 AM2015-06-18T03:05:02+5:302015-06-18T03:05:02+5:30
पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एका शिवसेना आमदाराने विक्रोळीच्या शाळेत अध्यक्षीय भाषणातून उधळलेल्या मुक्ताफळांची आॅडिओ
जयेश शिरसाट, मुंबई
पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एका शिवसेना आमदाराने विक्रोळीच्या शाळेत अध्यक्षीय भाषणातून उधळलेल्या मुक्ताफळांची आॅडिओ क्लिप ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. या क्लिपनुसार ‘संपूर्ण गँगवॉर माझ्यासोबत आहे. हे गँगवॉर मी सोबत घेऊन फिरतो’, असा अभिमान शिवसेना आमदाराने व्यक्त केला आहे. आमदाराची ही वाक्ये कानावर पडल्यानंतर भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना जबर धक्का बसला.
सुदैव इतकेच की त्या वेळी शाळेचा एकही विद्यार्थी या बैठकीला हजर नव्हता. विशेष म्हणजे जेव्हा याबाबत आमदार महोदयांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला, तेव्हा ‘होय, ते मी बोललो’, असे अजब स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
हे ‘स्फूर्तिदायक’ भाषण दिले आहे भांडुपचे विद्यमान आमदार अशोक धर्मराज पाटील (५६) यांनी. विक्रोळी पश्चिमेकडील धर्मवीर संभाजी विद्यालयात १४ मार्च रोजी शिक्षक - संचालक यांच्यात सुसंवाद राहावा, या हेतूने आयोजित केलेल्या बैठकीत पाटील यांनी तब्बल अर्धा तास भाषण दिले. पाटील हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीला शाळेचे संचालक, मुख्याध्यापिका आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. सुरुवातीला शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर पाटील भाषणाला उभे राहिले. त्यांनी या अडीअडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच शाळेत आर्थिक गैरव्यवहार खपवून घेणार नाही, अशीही तंबीदेखील दिली. मात्र त्यानंतर एका क्षणी त्यांचा ताबा सुटला.
कुठे मर्डर,
कुठे फायरिंग!
समाजातल्या सर्व स्तरांत माझा मित्रपरिवार आहे. अगदी संपूर्ण गँगवॉरही माझ्यासोबत आहे. राजकारणात टिकून राहायचे असेल तर गँगवॉर सोबत घ्यावेच लागते. अनेक फोन येतात. आज कुठे मर्डर होणार आहे, उद्या कुठे फायरिंग होणार आहे... सर्वांना सोबत घेऊन पुढे गेलो म्हणूनच मला लाखो मते पडली. शिक्षक-कर्मचाऱ्यांसमोर शाळेमध्ये ही मुक्ताफळे उधळल्याने आमदार पाटील यांच्या भाषणाची ही आॅडिओ क्लिप सध्या भांडुपमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
होय, ‘ते’ मी बोललो !
-होय, माझ्या भाषणात मी हा संदर्भ (अख्खा गँगवॉर माझ्यासोबत आहे.) दिला होता. पण तो चुकीच्या अर्थाने पसरवला जात आहे. गँगवॉरचे चांगले गुण किंवा चांगली बाजू मी घेत असतो, असे मला म्हणायचे होते, अशी प्रतिक्रिया आमदार अशोक पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
-मात्र आज कुठे मर्डर होणार, उद्या कुठे फायरिंग होणार, अशी माहिती देणारे फोन तुम्हाला येतात. या गंभीर गुन्ह्यांबाबत तुम्हाला आगाऊ माहिती असते का, असे ‘लोकमत’ने विचारले असता, पाटील म्हणाले, की मला तसे म्हणायचे नव्हते. हा संदर्भ मी नारायण राणेंसाठी वापरला होता.
-राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा भांडुपमधून फक्त मीच त्यांना विरोध केला होता. त्यामुळे माझ्या सर्व गाड्या फोडण्यात आल्या होत्या. घरी धमकीचे फोन येत असत. फोन करणारे माझ्या पत्नीला ‘आज तुझे कुंकू पुस,’ अशा धमक्या देत होते. या धमक्यांबाबत मी तो संदर्भ वापरला होता, असा दावा पाटील यांनी केला.