सर्व आमदारांचे निलंबन झाले तरी माघार नाही
By Admin | Published: April 3, 2017 05:24 AM2017-04-03T05:24:48+5:302017-04-03T05:24:48+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली आहे
उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली आहे. पण सत्तेची मस्ती चढलेले भाजपा सरकार आमदारांचे निलंबन करून विरोधकांचा आवाज दाबत आहे. मात्र कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांचे निलंबन झाले तरी चालेल; पण आता माघार घेतली जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रपूर येथून सुरू झालेली संघर्ष यात्रा रविवारी जिल्ह्यात दाखल झाली. या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत
ते बोलत होते. मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे
तसेच समाजवादी पार्टीचे अबू आझमी, आ. जितेंद्र आव्हाड, राणाजगजितसिंह पाटील, दिलीप सोपल, पतंगराव कदम, विद्या
चव्हाण, भारत भालके, राहुल
मोटे, विक्रम काळे, शेकापचे
भाई धनंजय पाटील, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह विरोधी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, ही संघर्ष यात्रा पद अथवा सत्ता मिळविण्यासाठी नाही. सत्तेवर विराजमान असलेल्या सरकारने शेती आणि शेतकऱ्यांची काळजी घ्यावी यासाठी आहे. ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे म्हणत भाजपा सत्तेवर विराजमान झाली. प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ, अशी ग्वाही दिली होती. परंतु, काँग्रेसप्रणित आघाडी सरकारने दिलेल्या दराच्या ५० टक्केही भाव अडीच वर्षांत हे सरकार देऊ शकलेले नाही.
केंद्र तसेच राज्यातील भाजपा सरकारकडून धनदांडग्यांसह उद्योगपतींना पायघड्या टाकून वाट्टेल ती मदत करताना या सरकारला तिजोरीतील खडखडाची चिंता वाटत नाही. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची म्हटले की, तिजोरीतील खडखडाटाचा मुद्दा पुढे येतो. कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)
>कर्जमाफी मिळेपर्यंत आमचा संघर्ष
औसा/उजनी (जि. लातूर) : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष सुरूच राहणार आहे. कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी येथे केले. बुधोडा, औसा मोड, बोरफळ, बेलकुुंड मार्गे ही संघर्ष यात्रा उजनी येथे पोहोचल्यानंतर तिथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.