सगळ्या मोदींनी देशाला छळले, फसवून पळालेले सर्व भाजपा समर्थक : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 08:01 AM2018-02-18T08:01:12+5:302018-02-18T08:02:06+5:30
केंद्राने दहशतवाद्यांशी लढण्यासाठी हाफ पँट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पाठवावे, म्हणजे त्यांना याचे तथ्यही कळेल.
पंढरपूर (जि. सोलापूर) : पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात ११ हजार कोटी रुपये घेऊन पळून गेला. देशाला फसवून जे - जे पळून गेले ते ते सगळे भाजपा समर्थक होते. या सगळ्या मोदींनी देशाला छळले आहे, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली.
काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी वाडीकुरोली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी बोलताना पवार यांनी भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. नीरव मोदी पळून गेल्यानंतर सरकार आता म्हणते त्याचा पासपोर्ट रद्द करू. २०१६ साली पंतप्रधान कार्यालयाला नीरव मोदी यांच्याबाबत आम्ही कळविले होते. चौकशी करून कारवाई करावी, असे सांगितले होते. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.
मोदी प्रकरणाची सुरुवात यूपीएच्या काळात झाली, असे सांगितले जाते. मात्र, नीरव मोदीला एका रात्रीत ११ हजार कोटी कोणी मंजूर करणार नाही. हा विश्वास त्याने हळूहळू संपादन केला. सरकारला कळवूनही त्याच्या दुष्कृत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ही देशाची लूट आहे. अशांचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा आहे, असेही पवार म्हणाले.
जर शेतक-यांकडे बँकेची ४-५ हजारांची थकबाकी राहिली तर त्याची भांडी बाहेर काढली जातात, त्याच्या अब्रूचा पंचनामा केला जातो़, हे
कसले राज्यकर्ते, असा सवाल करून पवार म्हणाले, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ३२ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत़ शेतकरी आता मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागला आहे, ही परिस्थिती चिंताजनक आहे.
स्वयंसेवकांना हाफ पॅन्ट घालून लढाईला पाठवा -
देशाच्या सैन्याने संरक्षणासाठी मोठी किंमत चुकविली आहे. काश्मीरमध्ये आपल्या हजारो सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. केंद्राने दहशतवाद्यांशी लढण्यासाठी हाफ पँट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पाठवावे, म्हणजे त्यांना याचे तथ्यही कळेल. आम्हाला याबाबत राजकारण करावयाचे नाही. भागवतांचे वक्तव्य भारतीय सैन्याची अप्रतिष्ठा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले.