सर्व महापालिकांत क्लस्टर हवे
By admin | Published: July 15, 2017 03:25 AM2017-07-15T03:25:48+5:302017-07-15T03:25:48+5:30
ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, नवी मुंबई अशा महापालिका क्षेत्रांतही पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेचे प्रस्ताव तयार करून ते त्वरित मंत्रालयात पाठवावेत, जेणेकरून ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.
जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आणि जुना आहे, असा मुद्दा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी या बैठकीत उपस्थित केला. तेव्हा कल्याण आणि मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महापालिकांनी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले. पण, त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. याचदरम्यान, खासदार कपिल पाटील यांनी जिल्हा परिषदेची इमारतही महापालिकेने धोकादायक जाहीर केली असल्याचे सांगताना, क्लस्टरमध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत सूचना त्यांनी केली. त्या वेळी पालकमंत्र्यांनी तीच इमारत नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या इतर शासकीय इमारती मिळून क्लस्टर योजनेंतर्गत बांधकाम करता येईल, हे पाहावे लागेल.
जर तसेच झाल्यास ते सर्व एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. तर, जिल्ह्यातील पालिकांनी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करून त्याचा प्रस्ताव पाठवण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले.
>ओसी नाही म्हणून डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया न थांबवण्याचा ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवणार
केवळ भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नाही, म्हणून मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेअन्स) प्रक्रि या थांबवू नये, त्यासाठी मुंबईप्रमाणे एमएमआरडीए क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थानादेखील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करून तसा ठराव मांडला. त्या वेळी पालकमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दर्शवून ठराव मुख्यमंत्र्यांकडे पाठवून या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले.या बैठकीत जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘परिवर्तन’ त्रैमासिकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. याप्रसंगी खासदार आणि आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.