अवघा महाराष्ट्र दिव्यांनी उजळला; 'जय श्री राम' घोषणेनं सर्वत्र भक्तीमय वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:27 PM2024-01-22T21:27:46+5:302024-01-22T21:29:13+5:30
बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला
अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता सर्वत्र पुन्हा दिवाळी साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दिपोत्सव केला जात आहे. अमरावतीच्या हनुमान गढीवर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला. हजारो दिवे लावून परिसर उजळून टाकला. खासदार नवनीत राणा यांनी जय श्री राम व ओम चित्र दिव्यांनी रेखाटले. हजारो दिव्यांनी हनुमानगढी उजाळून गेली होती. तर यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष करण्यात आला.
बुलढाण्यातही रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीने तब्बल ५०१ दिव्यांनी "जय श्रीराम" असे नाव साकारण्यात आले. जय श्रीराम साकारलेल्या नावाचे दिवे नगरपालिकेच्या सफाई करणाऱ्या महिलांनी प्रज्वोलित केले. यासह फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषही करण्यात आला. हा जल्लोष शहरातील पाहण्यासाठी संगम चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली.
बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या तिघा बहिण भावांनी सहभाग नोंदविला आहे. आज अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना ठेवली होती. यातूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वैद्यनाथ मंदिर परिसरात ११ हजार दीप प्रज्वलन करण्यात आले.
जालन्यात ठिकठिकाणी महिला दिवे लावून राम दिवाळी साजरी करण्यात येत आहे. जालना शहरातील बडी सडक येथील श्रीराम मंदिर परिसरात रामभक्तांनी दिव्यांची आरास केली असून परिसर दिव्यांच्या प्रकाशाने लखलखून गेला आहे. नागरिक दिवे लावण्यासाठी मोठी गर्दी करीत असून दिव्यांच्या प्रकाशाने आसमंत प्रकाशमय झाला आहे.कल्याण शहर शाखेच्या वतीने शिवकालीन किल्ले दुर्गाडीला ५ हजार दिव्यांची आरास करण्यात आली आहे. शेकडो नागरिकांनी या दीप महोत्सवात सहभाग घेतला होता. या दिव्यांच्या रोषणाईने किल्ले दुर्गाडी उजळून निघाला होता.