नितीन गडकरींच्या षष्ट्यब्दीपूर्तीला सर्वपक्षीय नेते येणार
By admin | Published: May 12, 2017 03:02 AM2017-05-12T03:02:43+5:302017-05-12T03:02:43+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त कस्तूरचंद पार्क येथे सायंकाळी ६ वाजता त्यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी, सिने कलावंत आदी उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याच्या आयोजनासाठी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समिती स्थापन करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे संयोजक तर सहसंयोजक वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे आहेत.