राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय समर्थन
By admin | Published: November 25, 2015 03:52 AM2015-11-25T03:52:06+5:302015-11-25T03:52:06+5:30
अयोध्येत राम मंदिर उभारण्यात यावे, यासाठी संसदेत विशेष कायदा संमत होण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा
नागपूर : अयोध्येत राम मंदिर उभारण्यात यावे, यासाठी संसदेत विशेष कायदा संमत होण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा. मंदिराच्या समर्थनार्थ काँग्रेससह जवळपास सर्वच पक्षातील नेत्यांचे समर्थन असल्याचा खळबळजनक दावा विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.
नागपुरात रास्वसंच्या एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘राजीव गांधी पंतप्रधान असताना शहाबानोप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश बाजूला सारत देशाच्या संसदेत मुस्लिमांच्या हिताचा कायदा करण्यात आला होता. राममंदिर श्रद्धेशी जोडलेले आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर न्यायालयाचा अंतिम निर्णय आला नसला, तरी संसदेने कायदा करावा,’ अशी मागणी तोगडियांनी केली. (प्रतिनिधी)
आमीरची मनोवृत्ती संकुचित
‘आमीर खानच्या पत्नीला देशात राहण्याची इच्छा होत नाही आणि तो हे जाहीरपणे सांगत असहिष्णुतेशी हा मुद्दा जोडतो, यावरून त्याची संकुचित मनोवृत्ती दिसून येते. एकीकडे कर्नल महाडिक शहीद झाल्यावर त्यांच्या वीरपत्नीने आपल्या मुलांना सैन्यात पाठवण्याचा संकल्प केला आहे, तर दुसरीकडे आमीर खान असहिष्णुतेचे कारण समोर करत देशावरच प्रहार करतो आहे,’ असे ते म्हणाले.