रेल्वेच्या सर्व प्रवाशांना आता अंथरूण-पांघरूण
By Admin | Published: August 26, 2016 06:54 AM2016-08-26T06:54:32+5:302016-08-26T06:54:32+5:30
मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने (इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) ‘ई-बेडरोल’ सेवा सुरू केली आहे.
मुंबई : मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने (इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) ‘ई-बेडरोल’ सेवा सुरू केली आहे. याद्वारे प्रवाशांना ट्रेनमध्येच अंथरूण-पांघरूण (बेडरोल किट) मिळेल. प्रारंभी त्याची अंमलबजावणी मुंबई सेंट्रल आणि सीएसटी येथून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी करण्यात येत असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली.
मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करताना रात्रीच्या वेळी आराम करण्यासाठी प्रवाशांना अंथरूण-पांघरूण उपलब्ध होत नाही. एसी डब्यांशिवाय अन्य स्लीपर किंवा जनरल डब्यांमध्ये अशी सुविधा नसल्याने, लांबच्या प्रवासात प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे या प्रवाशांना हे साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-बेडरोल’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई सेंट्रल आणि सीएसटीतून सुटणाऱ्या ट्रेनसाठी बुधवारपासून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून नवी दिल्ली, चेन्नई, त्रिवेंद्रम, हजरत निजामुद्दीनच्या मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना याचा लाभ घेता येईल, अशी माहिती आयआरसीटीसीचे गट महाव्यवस्थापक (पश्चिम झोन)
अरविंद मालखेडे यांनी दिली. ही सुविधा सध्या सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याला
चांगला प्रतिसाद मिळाल्यावर, ती अन्य स्थानकांवर सुरू केली जाणार
आहे. (प्रतिनिधी)
>साहित्यासाठी किंमत
दोन बेडशीट आणि उशी या संचासाठी
१४0 रुपये तर लोकरी ब्लँकेटसाठी
११0 रुपये मोजावे लागतील.
www.irctctourism.com या वेबसाईटद्वारे प्रवाशांना बेडरोल बुक करता येईल आणि त्यांना ट्रेनमध्ये हे साहित्य उपलब्ध होईल.
मुंबई सेंट्रल येथील फूड कोर्ट तर सीएसटी येथील फूड ट्रॅक फूड प्लाझा येथूनही प्रवासी अंथरूण-पांघरूण
प्राप्त करू शकतील. त्यासाठी आॅनलाइनमधून मिळालेले किट
व्हाउचर त्यांना दाखवावे लागेल.