सर्वच राजकीय पक्षानी प्रचारामध्ये घेतली आघाडी
By admin | Published: February 17, 2017 12:58 PM2017-02-17T12:58:15+5:302017-02-17T12:58:15+5:30
सर्वच राजकीय पक्षानी प्रचारामध्ये घेतली आघाडी
सर्वच राजकीय पक्षानी प्रचारामध्ये घेतली आघाडी
सोलापूर : महापालिका निवडणुकीत आता चांगले रंग भरू लागले असून, अंतिम टप्प्यामध्ये भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रभागातील दाट वस्तीच्या भागातील गणेशोत्सव मंडळे, संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसात भाजप, काँग्रेस, एमआयएम नेत्यांच्या जाहीर सभा झाल्यामुळे त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.
निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण होऊन चिन्हांचे वाटप झाल्यानंतर ८ फेब्रुवारीपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला. सुरुवातीचे एक-दोन दिवस थंड वाटणारा प्रचार पदयात्रांच्या माध्यमातून गतिशील झाला. यंदा प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्यामुळे प्रचारासाठी उमेदवारांना सहकारी उमेदवारांची साथ लाभत आहे. होटगी रस्ता, विजापूर रस्ता आणि जुळे सोलापूर परिसरात उमेदवारांनी एकत्र येऊन पदयात्रा काढल्याचे दिसून आले. शहराच्या गावठाण भागातही प्रमुख उमेदवार एकत्र येऊन प्रचार करताना दिसून येत आहेत.
सोलापूर हे उत्सवी शहर आहे. येथे गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीसह विविध उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. ते साजरे करणारी अनेक मंडळे प्रभावी आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने या मंडळांच्या कार्यकर्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
गल्लोगल्ली असणाऱ्या या मंडळांचा पाठिंबा मिळविण्यासाठी उमेदवारांकडून ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. एखाद्या गल्लीतील मंडळाने पाठिंबा जाहीर केला की, तेथील हजार-बाराशे मतांची चिंता मिटते, असा उमेदवारांचा अनुभव असल्यामुळे याही निवडणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना गोंजारले जात आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सभांचा माहोल आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय सरचिटणीस अली अजीजी यांच्या सभेनंतर सभांचे सत्र सुरू झाले. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची सभा झाली. राणे यांचे टीकास्त्र विरोधकांच्या वर्मी लागणारे असले तरी मतदारांसाठी त्यांची सभा आनंद देणारी असते.
त्यांच्या आसार मैदान आणि कर्णिकनगरमधील सभेला मोठा प्रतिसाद लाभला. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपासून जाहीर प्रचाराला प्रारंभ केला. त्यांनी विरोधकांवर टीका करताना विकासाचे मुद्देही मांडले. गेल्या दोन दिवसांपासून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे येथे ठाण मांडून आहेत. त्यांच्याही सभा गाजत आहेत.
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमवेत त्यांची बुधवारी संयुक्त सभा झाली. याशिवाय भाजपने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोेले यांचीही सभा आयोजित केली होती. एकूणच सभा, पदयात्रा आणि होम टू होम प्रचारात सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
-------------------------
वैयक्तिक भेटीगाठींना महत्त्व
दिवसभरात सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार जरी एकत्र येऊन प्रचार करताना दिसून येत असले तरी प्रत्येकानेच वैयक्तिक गाठीभेटींना महत्त्व दिले आहे. मतदारांची सकाळची वेळ घाईची असते. त्यानंतर नोकरी, व्यवसायात त्यांचा दिवस जातो. मतदार सायंकाळी जेव्हा घरी येतो तेव्हा उमेदवार त्यांना घरी जाऊन भेटत आहेत. मतदारही उमेदवार स्वत: येऊन भेटून गेल्याचे समाधान मानत आहेत.